धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला
ठाणे क्राईम न्यूज : ठाण्यातील मिरा रोड येथील काशीमीरा परिसरात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक पोलीस किरण सहाणे हे अमर पॅलेस परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. यावेळी ही घटना घडली. दोन दुचाकीस्वारांमध्ये एकमेकांना कट मारण्याच्या कारणावरुन जोरदार वाद सुरु झाला होता. सदर वाद मिटवण्यासाठी पोलीस किरण सहाणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी एका दुचाकीस्वाराने संतापाच्या भरात सहाणे यांच्यावरच हल्ला करत त्यांना मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मारहाण करणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला
घटनेनंतर मारहाण करणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी काशीमीरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या पोलिसावरच हल्ला झाल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, त्यानंतर तरुणानं संपवलं जीवन
पुण्यातील जुन्नर तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर आधी जीवघेणा हल्ला केला आणि मग स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे नाव महेश डामसे होते. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला असता आढळला मृतदेह
महेशचे डामसेचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र ती लग्नाला होकार देत नव्हती. या रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट आखला. जुन्नरमधील एका वस्तीगृहातून ही तरुणी महाविद्यालयात निघाली होती. तेव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तिला गाठले आणि कोयत्याने तिच्या डोक्यावर-चेहऱ्यावर वार केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर जुन्नर पोलीसांनी महेशचा शोध सुरु केला. तेव्हा आज सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळली तर तिथंच एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्हीमध्ये त्या परिसरात तो एकटाच गेल्याचं दिसून आलं, त्यामुळं ही आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरुन गेला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.