सह्याद्रीच्या कुशीतून शिंगळा माशाच्या नव्या प्रजातीचा शोध, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सह्याद्रीच्या खोऱ्यातून शिंगळा (कॅटफिश) माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यास ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील गोवा व महाराष्ट्र राज्यात नव्या माशाचा अधिवास आहे. संशोधनामध्ये स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अभिषेक शिर्पे यांनी सहभाग घेतला. फाऊंडेशनने यापूर्वीही दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला असून संशोधन कार्याची देश-विदेशात दखल घेतली गेली आहे.

शिंगळ्याच्या नव्या प्रजातीचा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी असलेले वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण नव्या दुर्मिळ माशाला लपण्यासाठी तसेच अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध करून देते. पश्चिम घाटामध्ये ‘अमलीसेप्स’ वंशाच्या आढळाची आतापर्यंतची सर्वात उत्तरेकडील पुष्टी झालेली नोंद आहे. दुभंगलेली शेपूट, अपूर्ण मध्य रेखा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱया शिरांमध्ये आकडय़ासारख्या आकाराचा अभाव अशी नव्या माशाची वैशिष्टय़े आहेत. शेपटीच्या ‘डोर्सल प्रोकरंट’ (पृष्ठाrय प्रवाह) भागास एकरूप न होता स्पष्टपणे वेगळा असलेल्या ‘अडिपोझ फिन’ची रचना वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. ‘अमलीसेप्स वायव्य’ या नव्या प्रजातीचा शोध पश्चिम घाटात संवेदनशील अधिवासाच्या पर्यावरणीय अभ्यासाची गरज अधोरेखित करीत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांच्या संशोधन कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.

नव्या माशाचे नामकरण ‘अमलीसेप्स वायव्य’

सह्याद्रीच्या कुशीतून नव्याने शोधलेल्या माशाचा समावेश ‘अमलीसेप्स’ कुळामध्ये केला आहे. पश्चिम घाटातील गोवा व महाराष्ट्र राज्यात अधिवास असणाऱया माशाचे नामकरण ‘अमलीसेप्स वायव्य’ असे करण्यात आले आहे. कोकणी आणि मराठी भाषेत ‘वायव्य’(उत्तर-पश्चिम) असा संदर्भ तिच्या उत्तर पश्चिम घाटातील वास्तव्यामुळे देण्यात आला आहे.

– माशाच्या नव्या प्रजातीची नोंद गोवा व महाराष्ट्रातील काही मर्यादित ठिकाणांवरून झाली आहे. दोन्ही राज्यांतील अंतर लक्षणीय असल्याने प्रजातीची उपस्थिती खूपच कमी व विखुरलेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागांतील ओढे व प्रवाह यांसारख्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा संवेदनशील अधिवासांचे जतन केल्यास गोडय़ा पाण्यातील अनेक माशांच्या प्रजातींचे संरक्षण होऊ शकते. मात्र खाणकाम, औद्योगिक सांडपाण्याचा होणारा निचरा, मायक्रो प्लॅस्टिकचे प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे सोडलेल्या माशांच्या परकीय प्रजाती यांसारख्या अनेक हस्तक्षेपामुळे येथील जलपरीसंस्थांना धोका निर्माण झाला आहे.

Comments are closed.