फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार
सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले : हल्लेखोर अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी
न्यूज एजन्सी/श्रीनगर
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावरील हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. जम्मूमधील ग्रेटर कैलाश येथे एका विवाह समारंभात हा हल्ला झाला. या विवाह सोहळ्याला फारुख अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांच्यासोबत पोहोचले होते. अचानक गर्दीतील एका इसमाने त्यांच्यावर पिस्तूल रोखत गोळीबार केला. सुदैवाने, नेम चुकल्याने या हल्ल्यातून अब्दुल्ला बचावले. तसेच त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला लगेच पकडून सुरक्षा दलाच्या हवाली केले आहे. ‘या हल्ल्यातून देवानेच मला वाचवले’ अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री हल्लेखोराने काही इंच अंतरावरून गोळीबार केला.
बंदुकीच्या गोळी त्यांच्या डोक्याला किंचित लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला रोखण्यात यश मिळवल्यामुळे ते जखमी झाले आहेत. न्यायालयाने हल्लेखोराला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, जम्मूमधील गोळीबाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फारुख अब्दुल्ला यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीची ओळख उघड केली असून कमल सिंग जामवाल असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. हल्लेखोर अंदाजे 65 वर्षांचा असून जम्मूच्या पुरानी मंडीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. चौकशीदरम्यान कमल सिंगने धक्कादायक खुलासा केला. मी गेल्या 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याची वाट पाहत होतो. आज मला संधी मिळाली, पण ते हल्ल्यातून बचावले, असे अटक झाल्यानंतर हल्लेखोराने स्पष्ट केले.
घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. त्यात 65 वर्षीय हल्लेखोर कमल सिंग जामवाल मागून येत फारुख यांच्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर रोखताना दिसत आहे. हल्लेखोर कमल सिंगकडे परवानाधारक पिस्तूल असून तो मद्यसेवन केलेल्या अवस्थेत होता असे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून शस्त्र जप्त करतानाच त्याचा हेतू केवळ वैयक्तिक शत्रुत्वाचा होता की इतर काही कट होता याचा तपास करत आहेत. सुरक्षा संस्था त्याची पार्श्वभूमी, संबंध आणि मानसिक स्थितीची देखील चौकशी करत आहेत.
जम्मूमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची निदर्शन
नॅशनल कॉन्फरन्सच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गुरुवारी जम्मूमध्ये निदर्शने करत पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. निदर्शकांनी पक्षाचे झेंडे, फलक आणि बॅनर हातात घेत केंद्र सरकार आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचे वर्णन केंद्रशासित प्रदेशातील लोकशाही राजकारणासाठी एक गंभीर आव्हान असल्याचे सांगितले. रॅलीला संबोधित करताना, नॅशनल कॉन्फरन्सच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘आमच्या नेत्यावरील हल्ला अस्वीकार्य आहे आणि जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे’ असे निदर्शकांना सांगितले.
Comments are closed.