द्रविडला ‘जीवनगौरव’, गिल ‘सर्वोत्तम क्रिकेटपटू’; नमन पुरस्कार सोहळ्यात क्रिकेटच्या धुरंधरांचा बीसीसीआय करणार सन्मान

हिंदुस्थानी क्रिकेटच्या गौरवशाली परंपरेला मानाचा मुजरा करणारा नमन पुरस्कार सोहळा संस्मरणीय ठरणार आहे. येत्या रविवारी 15 मार्चला दिल्लीमध्ये रंगणाऱया या सोहळ्यात  ‘द वॉल’ राहुल द्रविडला कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, तर दुसरीकडे धडाकेबाज फलंदाजी आणि नेतृत्वाने आपली आगळी चमक दाखवणाऱया शुभमन गिलच्या कामगिरीचा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.

गिलने गेल्या वर्षी अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीत सर्वाधिक 754 धावा करत आपला दबदबा निर्माण केला होता. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत रोखत मोठी कामगिरी केली. त्याची हीच कामगिरी 2025 मधील सर्वोत्तम आणि झुंजार ठरल्यामुळे त्याने अनेक जोरदार खेळी करणाऱया खेळाडूंना मागे टाकत सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. याशिवाय युवा वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेला देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार अष्टपैलू कामगिरीसाठी लाला अमरनाथ पुरस्कार देण्यात येणार आहे

महिला क्रिकेटमधील दिग्गज मिताली राज हिलाही जीवनगौरव पुरस्कार देण्याबाबत बीसीसीआय विचार करत असल्याचेही कळले आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण यशासाठी मुंबई क्रिकेट संघटनेला सर्वोत्कृष्ट राज्य क्रिकेट संघटनेचा पुरस्कार मिळाला आहे. सलग तिसऱयांदा एमसीएने या पुरस्कारावर आपला हक्क दाखवत विक्रम रचला आहे.

त्यामुळे दिल्लीतील हा सोहळा म्हणजे हिंदुस्थानी क्रिकेटच्या परंपरेला सलाम करत नायकांच्या कर्तृत्वाचा दणदणीत गौरव ठरणार आहे.

पाच जगज्जेते संघ एकाच मंचावर

गेल्या वर्षभरात हिंदुस्थानी क्रिकेटला विविध स्पर्धांत जगज्जेतेपद मिळवून देणाऱया पाचही संघांच्या कामगिरीचाही सन्मान केला जाणार आहे. गेल्या वर्षभरात हिंदुस्थानच्या पुरुष संघाने चॅम्पियन्स करंडक पटकावला. युवा संघाने एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप, तर युवतींच्या संघाने टी-20 वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्याचप्रमाणे महिला संघाने प्रथमच एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप हिंदुस्थानी भूमीवर जिंकण्याचा पराक्रम केला, तर नुकताच पुरुष संघाने टी-20 वर्ल्ड कप राखत एक नवा इतिहास घडवला. या पाचही जगज्जेत्यांना एकाच मंचावर बीसीसीआय सन्मानित करणार आहे.

'भिंत' राहुल द्रविडचा अनोखा ठसा

कसोटी क्रिकेट ः 164, धावा – 13,288, सरासरी – 52.31, शतके – 36

एकदिवसीय क्रिकेट: 318, धावा 10,889, शतके 12

टोपणनाव ः ‘द वॉल’ – संयम आणि चिकाटीचे प्रतीक

2018 पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली युवा वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद

प्रमुख: राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA)

मुख्य प्रशिक्षक म्हणून ः

जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 व आयसीसी वर्ल्ड कप 2023 ची अंतिम फेरी

टी 20 वर्ल्ड कप 2024 विजेते – आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.

Comments are closed.