पाकिस्तानी खेळाडूची खरेदी ‘सनरायझर्स’ला पडली महागात! काव्या मारन यांच्या निर्णयावर चाहते संतप्त, संघाचे ‘X’ खाते झाले सस्पेंड
इंग्लंडमध्ये आयोजित ‘द हंड्रेड’ (The Hundred) क्रिकेट लीगचे सामने लवकरच सुरू होणार आहेत. अशातच या मालिकेत खेळणारी सनरायझर्स लीड्स टीम सामना सुरू होण्यापूर्वीच वादात सापडली आहे. द हंड्रेड’ क्रिकेट लीगच्या लिलावात पाकिस्तानी लेग-स्पिनर अबरार अहमदला खरेदी केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. सन समूहाच्या मालकीच्या या संघाने अबरारला 2.34 कोटी रुपयांना खरेदी केले. कोणत्याही हिंदुस्थानी मालकीच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अबरार अहमदच्या निवडीनंतर सोशल मीडियावर ‘सनरायझर्स’ फ्रेंचाइजी आणि सीईओ काव्या मारन यांच्यावर टीका केली जात आहे. 2008 पासून हिंदुस्थान-पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे पाकिस्तानी खेळाडू आयपीएलपासून दूर आहेत. अशा परिस्थितीत देखील हिंदुस्थानी मालकीच्या संघाने घेतलेला हा निर्णय हिंदुस्थानींच्या भावनांच्या विरोधात असल्याची टीका युजर्स करत आहेत. या लिलावानंतर काही तासांतच सनरायझर्स लीड्सचे अधिकृत ‘X’ (ट्विटर) खातेही सस्पेंड करण्यात आले, ज्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे.
सोशल मीडियावर टीका होत असल्याचे पाहून संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल विटोरी यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली. केवळ क्रिकेटच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. आदिल रशीदला आपल्या संघात स्थान न मिळाल्याने संघ एका दर्जेदार गोलंदाजाच्या शोधात होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर आणि अबरारची ‘मिस्ट्री स्पिन’ गोलंदाजी लक्षात घेऊन त्याला संघात घेतले. पाकिस्तानी खेळाडूला घ्यायचे की नाही, यावर व्यवस्थापनात कोणतीही विशेष चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लंडनमध्ये झालेल्या या लिलावात अबरार अहमद हा विकला जाणारा दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला. त्यापूर्वी उस्मान तारिकला बर्मिंगहॅम फिनिक्सने 1.73 कोटी रूपयांना खरेदी केले होते. सनरायझर्स लीड्सने अबरारला टीममध्ये घेतल्यामुळे हिंदुस्थानी चाहत्यांची मने दुखावली आहेत.
Comments are closed.