आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष
झुरळ सायबॉर्ग्स: सध्या इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाची (Iran Israel America War) जगभर चर्चा सुरु आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आगामी काळात जिवंत झुरळ शत्रूच्या बंकरमध्ये घुसून हेरगिरी करताना दिसतील. जर्मनीमधील हेल्सिंग या स्टार्ट-अप कंपनीकडून झुरळांची सेना (Cockroach Cyborg) तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
जर्मनीमधील शास्त्रज्ञ झुरळांचे रोबोटमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांचा वापर हेरगिरी आणि लष्करी मोहिमांमध्ये केला जाऊ शकेल. जिवंत झुरळांच्या पाठीवर अत्यंत लहान इलेक्ट्रॉनिक ‘बॅकपॅक्स’ (पिशव्या) जोडल्या जातात. यांना “झुरळ-सायबॉर्ग्स” (cockroach cyborgs) असेही संबोधले जात आहे. या बॅकपॅक्समध्ये सेन्सर्स, कॅमेरे आणि दळणवळण यंत्रणा (communication systems) बसवलेल्या असतात; ज्यामुळे या झुरळांना शत्रूच्या हद्दीत घुसखोरी करून गुप्त माहिती गोळा करणे शक्य होते.
कोसळलेल्या इमारती, अरुंद बोगद्यात झुरळ सहजपणे प्रवेश करणार- (Cockroach Cyborgs)
हे तंत्रज्ञान विशेषतः अशा वातावरणांसाठी तयार केले जात आहे जिथे मानसांना, ड्रोन किंवा नेहमीच्या रोबोटला पोहोचणे अशक्य असते. उदाहरणार्थ, कोसळलेल्या इमारती, अरुंद बोगदे किंवा प्रत्यक्ष युद्धक्षेत्रे. अशा ठिकाणी, हे झुरळ सहजपणे आत प्रवेश करून माहिती गोळा करू शकतात.
‘रोबोटिक झुरळ’ नेमके काम कसे करतात? (Cockroach Cyborgs)
या झुरळांच्या पाठीवर जोडलेल्या सूक्ष्म बॅकपॅकमध्ये सेन्सर्स, कॅमेरे आणि दळणवळण मॉड्यूल्ससह विविध प्रकारची उपकरणे बसवलेली असतात. ही यंत्रणा ‘रिअल-टाइम’ (तात्काळ) माहिती प्रसारित करण्यास आणि सभोवतालच्या वातावरणाविषयी माहिती गोळा करण्यास सक्षम असते. शिवाय, शास्त्रज्ञ या कीटकांच्या हालचालींवर नियंत्रणही ठेवू शकतात. हे काम सौम्य विद्युत संकेत (electrical signals) पाठवून साध्य केले जाते; ज्यामुळे एखादा चालक (operator) दूरवरूनच झुरळाच्या हालचांची दिशा नियंत्रित करू शकतो. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने, हे कीटक एकत्रितपणे एका “थव्याप्रमाणे” (swarm) काम करू शकतात; ज्यामुळे मोठ्या क्षेत्रांवर पाळत ठेवणे अधिक सुलभ होते.
नेमके झुरळांचीच निवड का करण्यात आली? (Cockroach Cyborgs)
शास्त्रज्ञांच्या मते, झुरळ हे निसर्गातील सर्वात कणखर आणि टिकाऊ जीवांपैकी एक आहेत. ते अत्यंत अरुंद जागेतूनही सहजपणे वाट काढू शकतात आणि अगदी प्रतिकूल व कठीण परिस्थितीतही जिवंत राहू शकतात. याव्यतिरिक्त, त्यांच्या शरीरावर हलकी उपकरणे वाहून नेण्याची शारीरिक क्षमताही असते. सध्या, त्यांच्या पाठीवर सुमारे 10 ते 15 ग्रॅम वजनाचा सूक्ष्म बॅकपॅक बसवता येतो, ज्यामध्ये कॅमेरे आणि सेन्सर्ससारखी उपकरणे मावू शकतात.
केवळ युद्धातच नव्हे, तर बचाव मोहिमांमध्येही उपयुक्त- (Cockroach Cyborgs)
या तंत्रज्ञानाचा वापर केवळ लष्करी हेरगिरीसाठीच नव्हे, तर इतर विविध उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, भूकंप किंवा एखाद्या मोठ्या अपघातानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी या रोबोटिक झुरळांचा वापर केला जाऊ शकतो.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.