शेअर बाजार तिसऱ्या आठवड्यात घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे तब्बल 20 लाख कोटी बुडाले
नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण कायम आहे. अमेरिका आणि इराण युद्ध कायम राहणं, कच्चा तेल्याच्या दरात झालेली वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली भारतीय शेअरची विक्री यासह इतर कारणांमुळं भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 घसरणीसह बंद झाले.
भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 13 मार्चला 1471 अंकांनी घसरुन 74563.92 अंकांवर आला. तर निफ्टी 50 निर्देशांक 488 अंकांनी घसरुन 23151.10 अंकांवर आला. बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक आणि बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांक देखील 2.67 टक्क्यांनी घसरला.
9 ते 13 मार्च या पाच दिवसात सेन्सेक्स 4355 अंकांनी म्हणजेच 5.5 टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी 50 निर्देशांक 5.3 टक्क्यांनी म्हणजेच 1300 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांनी या पाच दिवसांमध्ये तब्बल 20 लाख कोटी रुपये गमावले आहेत. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 450 लाख कोटींवरुन 20 लाख कोटींनी कमी होऊन 430 लाख कोटींवर आलं आहे.
शेअर बाजारातील घसरणीची कारणं
अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं होतं. हे युद्ध दोन आठवडे झाले तरी संपण्याची शक्यता चिन्हं दिसत नाहीत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा आणि शहीद जवानांच्या मृत्यूचा आणि लहान मुलींच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचं म्हटलंय. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या जहाजांवर हल्ले करणं सुरु आहे याशिवाय आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणकडून हल्ले सुरु आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.
अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कच्चा तेलाचे दर वाढण्यामध्ये झाला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचले आहेत. यामुळं शेअर बाजारावर परिणाम होत आहे. जो पर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरु राहील तोपर्यंत कच्चा तेलाच्या दरातील वाढ कायम राहू शकते.
दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण सुरु आहे. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 92.45 रुपयांवर पोहोचला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचं सत्र कायम आहे. मार्च महिन्यात 12 मार्च पर्यंत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 46167 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. जुलै 2025 पासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार विक्री करत आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.