मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी पूल अखेर वाहतुकीस खुला; 17 वर्षांपासून रखडलेल्या महामार्ग खुला झाल्याने प्रवाशांना दिलासा
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील बावनदी येथील नवीन पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
बावनदी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे मुख्य काम पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बावनदी परिसरातील जोड रस्त्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर काही अडचणी कायम असल्या तरी मुख्य पूल वाहतुकीस खुला झाल्याने प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. पूर्वीचा पूल पावसाळ्यात अनेकदा धोक्याची पातळी ओलांडत असे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यास वाहतुकीवर परिणाम होत होता आणि अपघाताची शक्यता वाढत होती. त्यामुळे नवीन पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
अखेर नवीन पूल पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र उर्वरित जोड रस्त्यांची कामेही लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
Comments are closed.