ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डील प्रक्रिया लांबणार?

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेमुळं अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर दोन्ही देशांकडून स्वाक्षरी करण्यात येणार होती. ती लांबणवीर पडू शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून जगातील 16 व्यापारी भागीदारांची चौकशी करुन त्यांच्यावर टॅरिफ लादण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या 16 देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. रॉयटर्सनं चार भारतीय सूत्रांच्या आधारे भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डील काही महिने रखडू शकते, असं वृत्त दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळं दोन्ही देशांमध्ये नवे मतभेद निर्माण झाले आहेत.

भारताच्या अपेक्षेनुसार मार्च महिन्यात अंतरिम करारावर स्वाक्षरी होणं अपेक्षित होतं. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतिम करारावर स्वाक्षरी झाली असती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करार करत असल्याची घोषणा फेब्रुवारीमध्ये केली होती. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं लादण्यात आलेलं 25 टक्के दंडात्मक टॅरिफ अमेरिकेनं व्यापार कराराच्या घोषणेनंतर रद्द केलं होतं.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थांच्या चौकशीच्या घोषणेमुळं निर्माण झालेल्या स्थितीमुळं व्यापार कराराची प्रक्रिया आणखी काही  महिने लांबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतानं जो शब्द दिला आहे, त्याचं पालन करावं, असं म्हटलं आहे. भारत सरकाराच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार व्यापारी करारात अडथळे येणार नाहीत. दोन्ही बाजू समन्वयानं व्यापार करार पूर्ण करण्यास कटिबद्ध आहेत.

व्हाईट हाऊसच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं की अमेरिका भारतासोबतच्या व्यापारी करार अंतिम करण्यासाठी काम करत आहे.

भारत सरकारच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवलेली नाही, ती कमी करण्यात आली होती. आता अमेरिकन अधिकाऱ्यांकडून रशियाकडून तेल खरेदी वाढवण्यास सांगितलं जातंय. भारताच्या एका सूत्रांकडून व्यापार कराराबद्दल घाई नसल्याचं सांगण्यात आलं. चौकशीचा प्रयत्न म्हणजे अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या टॅरिफ संदर्भातील आदेशानंतर व्यापार करार करुन घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यासारखं असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

अमेरिकेचं टॅरिफ संदर्भातील धोरण बदलत असताना वेट अँड वॉचची भूमिका भारताची असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे टॅरिफ लादण्याचे विविध मार्ग असल्याचं म्हटलं आहे. आम्ही ज्या देशांसोबत करार जाहीर केले आहेत, त्यांनी ते पूर्ण करावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.