५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या प्रदक्षिणेला, नासाची ‘आर्टेमिस २’ मोहीम एप्रिलमध्ये झेप घेणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपल्या ऐतिहासिक ‘आर्टेमिस २’ मोहिमेची तयारी पूर्ण केली असून, १ एप्रिल २०२६ रोजी हे यान चंद्राच्या दिशेने झेप घेणार असल्याची घोषणा केली आहे. ५० वर्षांहून अधिक काळानंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या कक्षेमध्ये जाणार असल्याने जागतिक स्तरावर या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नासाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून हे प्रक्षेपण पार पडणार आहे. यासाठी १९ मार्च रोजी शक्तिशाली स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) रॉकेट आणि ओरियन अंतराळयान प्रत्यक्ष लॉन्च पॅडवर तैनात केले जाईल. जर १ एप्रिल रोजी काही कारणास्तव प्रक्षेपण शक्य झाले नाही, तर २ एप्रिल ही तारीख राखीव ठेवण्यात आली आहे. दोन दिवसांच्या प्रदीर्घ तांत्रिक पुनरावलोकनानंतर सर्व पथकांनी या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला आहे.

या मोहिमेत चार अंतराळवीरांचा समावेश असून त्यात नासाचे रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे. हे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नसले तरी, १० दिवसांच्या या प्रवासात ते चंद्राला वळसा घालून पृथ्वीवर सुखरूप परततील. या काळात अंतराळयानातील जीवनरक्षक प्रणाली आणि मानवी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची कठोर चाचणी केली जाईल.

Comments are closed.