आयपीएलमध्ये समान क्रिकेट कायदा, बीसीसीआयचे 10 कडक नियम फ्रेंचायझींना लागू
आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी बीसीसीआयने लागू केलेली 10 कठोर मार्गदर्शक तत्त्वे आता स्पर्धेत जणू ‘समान क्रिकेट कायदा’ ठरणार आहेत. पिचची गुणवत्ता टिकवणे, सरावातील असमानता दूर करणे आणि सर्व संघांना समान संधी देणे हा या नियमांचा गाभा आहे. त्यामुळे आयपीएलमधील स्पर्धा अधिक निष्पक्ष आणि व्यावसायिक करण्याचा बीसीसीआयचा स्पष्ट प्रयत्न दिसत असल्याचे समोर आले आहे.
विरोधी संघाच्या खेळपट्टीवर सरावास बंदी
नव्या नियमांनुसार एका संघाने वापरलेली नेट किंवा सराव खेळपट्टी दुसऱया संघाला वापरता येणार नाही. दोन संघ सलग सराव करत असतील तर प्रत्येक संघाला स्वतंत्र नेट आणि खेळपट्टी उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल. सराव सत्र लवकर संपले तरी दुसऱया संघाला तीच खेळपट्टी वापरण्याची मुभा मिळणार नाही.
सामन्याच्या खेळपट्टीचे संरक्षण
ज्या खेळपट्टीवर अधिकृत सामना खेळला जाणार आहे त्यावर कोणत्याही प्रकारचा सराव पूर्णपणे बंद राहील. तसेच संबंधित फ्रेंचायझीच्या पहिल्या घरच्या सामन्यापूर्वी चार दिवस मुख्य स्क्वेअरवर सरावाला परवानगी दिली जाणार नाही. यामुळे खेळपट्टीचा दर्जा कायम राखला जाईल.
सराव सामन्यांवर मर्यादा
फ्लडलाइटखाली होणाऱया सराव सामन्यांसाठीही बीसीसीआयने स्पष्ट नियम घातले आहेत. प्रत्येक फ्रेंचायझीला जास्तीत जास्त दोन प्रॅक्टिस सामने खेळण्याची मुभा असेल आणि त्यासाठी बोर्डाला आधी माहिती देणे आवश्यक असेल. अशा सराव सामन्यांचा कालावधी साडेतीन तासांपेक्षा जास्त असू शकत नाही.
तत्सम सराव सुविधा
दोन्ही संघांना सरावासाठी दोन नेट दिले जातील, तर रेंज-हिटिंगसाठी मुख्य स्क्वेअरवर एक स्वतंत्र नेट उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही तयारीची समान संधी मिळेल.
वाद झाल्यास पाहुण्या संघाला प्राधान्य
सराव वेळापत्रकावर वाद निर्माण झाल्यास पाहुण्या संघाला प्राधान्य देण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे. प्रवास करून आलेल्या संघाला योग्य तयारीची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. बीसीसीआयचे हे कठोर नियम आयपीएलमध्ये समानता, निष्पक्षता आणि दर्जेदार क्रिकेट टिकवण्यासाठीचा ‘समान क्रिकेट कायदा’ ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Comments are closed.