आयुक्तांविरोधात संसदेत विरोधी पक्षांची नोटीस

ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी एकजूट : 200 हून अधिक खासदारांची स्वाक्षरी : आम आदमी पक्षाचाही पाठिंबा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांनी शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेत नोटीस सादर केल्या. 200 हून अधिक खासदारांनी या नोटीसवर स्वाक्षरी केली आहे. या नोटीसमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांवर सात आरोप करण्यात आले असून त्यात पदावर असताना पक्षपाती आणि भेदभावपूर्ण वर्तन, निवडणुकीच्या घोटाळ्याच्या चौकशीत जाणूनबुजून अडथळा आणणे आणि मतदारांचे मोठ्या प्रमाणात मतदान हिरावून घेणे यांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी अशी नोटीस दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘एसआयआर’ची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केंद्रीय निवडणूक आयुक्त विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. त्याच माध्यमातून आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सभाध्यक्षांकडे नोटीस देऊन विरोधी पक्षाच्या खासदारांनी चर्चेची मागणी केली आहे. 130 लोकसभा खासदार आणि 63 राज्यसभा खासदारांनी या नोटीसवर स्वाक्षरी केली आहे. खासदार या नोटीसबद्दल खूप उत्साही होते आणि आवश्यक संख्या गाठल्यानंतरही अनेकांनी गुरुवारी स्वाक्षरी केल्याचे एका विरोधी नेत्याने सांगितले. नियमांनुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याच्या नोटीससाठी किमान 100 लोकसभा खासदार आणि 50 राज्यसभा खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. विरोधी आघाडी ‘इंडिया’मधील सर्व पक्षांच्या खासदारांनी नोटीसवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शिवाय, आम आदमी पक्षाच्या खासदारांनीही नोटीसवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा पक्ष आता अधिकृतपणे इंडिया आघाडीचा भाग नाही.

ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप…

मुख्य निवडणूक आयुक्त सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करत आहे.

एसआयआर प्रक्रिया केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी केली जात आहे.

विशेषत: पश्चिम बंगालमध्ये एसआयआरबद्दल अधिक चिंता व्यक्त केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी आयोगावर मतदारांची नावे काढून टाकल्याचा आरोप केला

Comments are closed.