आसाममध्ये कोट्यवधींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधानांचे गुवाहाटीमध्ये जल्लोषी स्वागत : दोन दिवसांच्या दौऱ्यात विविध योजनांना चालना मिळणार
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते दुपारी 1:30 च्या सुमारास गुवाहाटीत पोहोचल्यानंतर त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते गुवाहाटी व्यतिरिक्त कोक्राझार आणि सिलचरला भेट देणार होते. परंतु खराब हवामानामुळे त्यांनी कोक्राझारमधील कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. जनतेला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना त्यांनी अनेक दशकांपासून बोडोलँड प्रदेशातील लोकांचा विश्वासघात करण्यात आल्याचा हल्लाबोल विरोधकांवर केला. बोडोलँडचे काही व्हिडिओ दाखवून काँग्रेसने आम्हाला खोट्या स्वप्नांमध्ये अडकवल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसने कागदी करार दिखाव्यासाठी केले. तुम्ही काँग्रेसला बाहेर काढले आणि एनडीएला संधी दिली, म्हणून आम्ही शहाणपणाचे निर्णय घेतले. असा आरोप पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केला. काँग्रेस ही खोट्या आश्वासनांची दुकान आहे. ते एका आश्वासनासोबत चार खोटे बोलतात. आता तुमच्याकडे भाजपचे यशस्वी मॉडेल आहे. 2003 मध्ये, जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत एनडीए सरकार सत्तेत होते, तेव्हा सत्य आणि प्रामाणिकपणाने काम करण्यात कोणतीही कसर सोडली गेली नाही. एनडीएचे डबल-इंजिन सरकार आसामच्या वारशाचे जतन आणि त्याचा जलद विकास यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचा दावा मोदींनी केला.
कोक्राझारसह या संपूर्ण प्रदेशाला गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आज, बोडोलँड शांतता आणि विकासाच्या मार्गावर आहे. आज, आसाम शांतता आणि प्रगतीचा एक नवीन अध्याय लिहित आहे. आज, मी तुम्हाला येत्या निवडणुकीत काँग्रेसला कठोर शिक्षा करण्याचे आवाहन करण्यासाठी आलो असल्याचे सांगतानाच आसाममध्ये घुसखोरांसाठी कोणतेही स्थान नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी आसामच्या भूमीतून दिला.
'पीएम किसान' सप्ताह सुरू आहे
आसाम दौऱ्यात पंतप्रधानांनी ईशान्येसाठी तीन नवीन गाड्यांचे उद्घाटन केले. गुवाहाटी येथे सुमारे 19,680 कोटी रुपयांचे अनेक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. तसेच येथील एका कार्यक्रमातून ‘पीएम किसान’ योजनेचा 22 वा हप्ता त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित केला. आता 14 मार्च रोजी सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान सिलचर येथे भूमिपूजन समारंभ करतील आणि सुमारे 23,550 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.
Comments are closed.