चार वर्षांत 13 हजार कोटींनी पालिकेच्या ठेवी घटल्या, विधान परिषदेत सरकारची कबुली
मुंबई महानगरपालिकेच्या भविष्यासाठी तरतूद असणाऱया 91 हजार कोटींच्या ठेवी गेल्या चार वर्षांत तब्बल तेरा हजार कोटींनी घटून 79 हजार कोटींवर आल्या. सरकारच्या माध्यमातून खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. मात्र गेल्या दीड वर्षात पालिकेच्या ठेवी दीड हजार कोटींनी वाढल्याचा दावाही सामंत यांनी केला. याबाबत त्यांनी विधान परिषदेत आकडेवारीच जाहीर केली.
मुंबई महानगरपालिकेत विरोधकांच्या माध्यमातून नियम 260 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेवर बोलताना शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी पालिकेत गेल्या चार वर्षांत प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू असताना झालेल्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली होती. 600 कोटी तुटीत असणारी पालिका शिवसेनेच्या 25 वर्षांच्या कार्यकाळात 92 हजार कोटींपर्यंत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशासकाच्या कार्यकाळात या ठेवी घटल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. यावेळी शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनीदेखील पालिकेच्या घटलेल्या ठेवींबाबत प्रश्न उपस्थित करीत पालिकेच्या आर्थिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली होती. शिवाय पालिकेच्या अनेक प्रश्नांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर आज मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर उत्तर सादर केले.
सरकार म्हणाले…
महापालिकेचा भविष्य निर्वाह निधी सुमारे 5,853 कोटी रुपयांचा असून तो सुरक्षित ठेवण्यात आला आहे. निवृत्ती वेतनासाठीही सुमारे 3,949 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांच्या वेतन किंवा पेन्शनबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
– बेस्ट उपक्रमाला दरवर्षी सुमारे 1 हजार कोटी रुपयांची मदत दिली जाते. याशिवाय बस खरेदीसाठी महापालिकेने अतिरिक्त 450 कोटी रुपये दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
– प्रार्थनास्थळे, शाळा आणि रेल्वे स्थानकांपासून 100 मीटर अंतरावर फेरीवाले नसावेत यासाठी समित्या नेमण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
वर्ष ठेवींची रक्कम
2017 62 हजार 191 कोटी
2018 72 हजार कोटी
2019 76 हजार 579 कोटी
2020 79 हजार 115 कोटी
2021 78 हजार 745 कोटी
2022 91 हजार 990 कोटी
2023 86 हजार 401 कोटी
2024 82 हजार 737 कोटी
2025 79 हजार 498 कोटी
Comments are closed.