‘रास्कल’, अभिषेक शर्माबद्दल ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकीपरचे मोठे वक्तव्य

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या सुरूवातीला भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा काही खास कामगिरी करू शकला नाही. तो या स्पर्धेआधी चांगलाच फॉर्ममध्ये होता आणि तो आयसीसी फलंदाजांच्या टी२० क्रमवारीतही पहिल्या स्थानी होता. त्यामुळे त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा होती, मात्र सुरूवातीला तसे काही घडले नाही. त्याने अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. आता त्याच्याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकीपर ब्रॅड हॅडिनने चकित करणारे वक्तव्य केले आहे.

हॅडिनने अभिषेकचे कौतुक करत त्याला मस्करीमध्ये रास्कल (लबाड) म्हटले आहे. त्याने विलो टॉक क्रिकेट पॉडकास्टवर बोलताना म्हटले, “मी अभिषेकचा खूप मोठा चाहता आहे. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या कामगिरीबाबात बरीच चर्चा झाली. तो साखळी सामन्यांमध्ये सलग शून्यावर बाद झाल्याने तो अचानक दबावाखाली असल्याचे वाटले. महत्वाच्या सामन्यात अशा खेळाडूंची आवश्यकता असते, जे धाडसीपणे खेळतात आणि जोखीम घेण्यास मागेपुढे पाहत नाही. अभिषेकने नेमके तेच केले. तो विरोधी संघांवर दबाव आणतो आणि अंतिम सामन्यात त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली ते सर्वोत्तम होते.”

अभिषेकने न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात १८ चेंडूत अर्धशतक केले होते. त्यामुळे तो टी२० विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने २१ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या.

अभिषेकची या स्पर्धेची सुरूवात चांगली झाली नाही, मात्र शेवट त्याने उत्तम केला. त्याने या स्पर्धेत २ अर्धशतके केली आहे. त्याने सर्व ९ सामन्यात खेळताना १५८.४२च्या स्ट्राईक रेटने १४१ धावा केल्या. तो पहिल्या तीन सामन्यांमध्येच शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ धावा केल्या आणि झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक केले.

Comments are closed.