आयपीएल 2026 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची मेंटॉर पदावरून माघार

आयपीएल 2026 सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले असून 28 मार्चपासून जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला सुरुवात होणार आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ अतिशय प्रबळ दिसत आहे. डेव्हिड मिलर, आकिब नबी आणि बेन डकेट यांसारख्या स्फोटक खेळाडूंना ताफ्यात सामील करून त्यांनी आपली ताकद वाढवली आहे. मात्र, स्पर्धेच्या तोंडावर दिल्लीला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचे दिग्गज माजी खेळाडू केविन पीटरसन (Kevin Peterson) यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या ‘मेंटॉर’ (मार्गदर्शक) पदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
केविन पीटरसन यांनी आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मेंटॉर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव संघाच्या खेळण्याच्या शैलीवर स्पष्टपणे दिसून येत होता. आता आयपीएल 2026 सुरू व्हायला केवळ दोन आठवडे शिल्लक असताना, पीटरसन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे या वेळी ते मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार नाहीत. तसेच त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व खेळाडूंना आगामी हंगामासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडली असली तरी, पीटरसन आयपीएलमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी सांगितले की, यावेळी ते कॉमेंट्री (भाष्यकार) करताना प्रेक्षकांच्या भेटीला येतील. आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग असून तिथे कॉमेंट्री करण्यासाठी आपण खूप उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीचा संघ आजही अत्यंत संतुलित आणि मजबूत दिसत आहे. केएल राहुल, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, नितीश राणा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि लुंगी एनगिडी यांसारख्या मोठ्या नावांसह त्यांनी अनेक दर्जेदार बॅकअप खेळाडूही संघात घेतले आहेत. त्यामुळे यंदा दिल्लीचा संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
Comments are closed.