Iran War – आखाती देशांत युद्धाचा भडका; भितीमुळे हिंदुस्थानी लाखांची नोकरी सोडून परतत आहेत मायदेशात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखातात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथील सुरक्षित आणि स्थिर प्रतिमेला मोठा तडा गेला असून, तेथे कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रमुख एक्झिक्युटिव्ह सर्च फर्म्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत आखाती देशांतील मोठ्या पदांवर काम करणाऱ्या हिंदुस्थानींकडून हिंदुस्थानात नोकरी शोधण्याच्या प्रमाणात 25 ते 30 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या अहवालानुसार, केवळ युद्धजन्य परिस्थितीच नव्हे, तर भविष्यातील अनिश्चितता पाहून अनेक कुशल व्यावसायिक आता सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत.

कतारमधील बहुराष्ट्रीय टेक कंपन्यांमध्ये काम करणारे मध्यम-स्तरीय व्यावसायिक आणि दुबईतील अनेक कुटुंबे सध्या कमालीच्या तणावाखाली आहेत. हा भीतीचा प्रभाव केवळ सीमेपुरता मर्यादित नसून तो घराघरात पोहोचला आहे. हिंदुस्थानात राहणाऱ्या वृद्ध पालकांच्या काळजीपोटी अनेक तरुण व्यावसायिक मायदेशी परतण्याचा विचार करत आहेत. दुबईत तर रहिवाशांना खिडक्या आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचे वारंवार अलर्ट दिले जात आहेत. सुरक्षिततेच्या या वातावरणामुळे कित्येक वर्षांपासून स्थिरावलेली कुटुंबे आता त्यांच्या भविष्यातील निर्णयांबाबत संभ्रमात आहेत.

Dubai International Financial Center सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी घडलेल्या घटनांनी या भीतीवर शिक्कामोर्तब केले आहे. ईएमए पार्टनर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. सुदर्शन यांच्या मते, अलीकडेच एका धमकीच्या इशाऱ्यानंतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते, तर शुक्रवारी आर्थिक केंद्रावर इराणी ड्रोनचे अवशेष पडल्याने लोकांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम झाला आहे. जरी काही तज्ज्ञांना पुढील 10 ते 14 दिवसांत परिस्थिती सुधारेल अशी आशा असली, तरी सुरक्षेबाबत निर्माण झालेली ही भीती हिंदुस्थानी नागरिकांना पुन्हा आपल्या देशात वळण्यास प्रवृत्त करत आहे.

Comments are closed.