केकेआरने स्वतःच्याच पायावर मारून घेतला धोंडा? श्रेयस-सॉल्टला सोडल्याने दिग्गज क्रिकेटपटू संतापला!

​२८ मार्चपासून आयपीएल २०२६ चा थरार सुरू होणार असून सर्व १० संघ जोरदार तयारी करत आहेत. या हंगामात तीन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आपले चौथे जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दरम्यान, स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने मोठे विधान केले आहे. कुंबळेच्या मते, आयपीएल २०२४ चे जेतेपद जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्टला संघातून बाहेर काढून केकेआरने मोठी चूक केली आहे. जोपर्यंत केकेआर आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात टिकवून ठेवण्याचे महत्त्व समजत नाही, तोपर्यंत त्यांना जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जाऊ शकत नाही, असे कुंबळेने म्हटले आहे.

​अनिल कुंबळेने ‘जिओ हॉटस्टार’च्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “दोन वर्षांपूर्वी केकेआरने आयपीएल जिंकले आणि आपली तिसरी ट्रॉफी उचलली होती. त्या विजयातील दोन महत्त्वाचे खेळाडू श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्ट होते. दोघांनीही संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली, पण केकेआरने दोघांनाही जाऊ दिले. खेळाडूंना आपल्यासोबत ठेवण्याच्या बाबतीत त्यांच्यात कोणतेही सातत्य नाही. श्रेयस आणि सॉल्टला जाऊ देऊन केकेआरने चुकीचा निर्णय घेतला आणि यामुळेच आता त्यांच्याकडे आयपीएल जिंकलेला कोणताही कर्णधार नाही.”

​विशेष म्हणजे, श्रेयस आता पंजाब किंग्सकडून खेळतो आणि त्याने गेल्या हंगामात संघाला फायनलपर्यंत नेऊन आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे, सॉल्ट रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाचा भाग असून आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोठे योगदान दिले आहे.

​कुंबळे पुढे म्हणाला की, जरी केकेआरकडे अनुभवी कर्णधार अजिंक्य रहाणे असला, तरी त्याने अजून आयपीएल जेतेपद जिंकलेले नाही. ट्रॉफी जिंकलेला कर्णधार संघासाठी मोठा फायदा ठरतो, असे कुंबळेचे मत आहे. तो म्हणाला, “अजिंक्य रहाणे हा एक अनुभवी खेळाडू आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे, पण कर्णधार म्हणून त्याने अद्याप आयपीएल चषकावर नाव कोरलेले नाही.”

​त्याने पुढे नमूद केले की, “ज्या कर्णधाराने ट्रॉफी जिंकली आहे असा कर्णधार असणे तुम्हाला फायद्याचे ठरते. आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात कसे टिकवून ठेवायचे हे त्यांना शिकावे लागेल. अन्यथा ते संघर्ष करत राहतील आणि त्यांना ट्रॉफी जिंकण्याचे दावेदार मानले जाऊ शकत नाही.”

​भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेने श्रेयस अय्यरचे भरभरून कौतुक केले. तो म्हणाला की, श्रेयसने नवीन वातावरण आणि नवीन संघासोबतही उत्कृष्ट काम केले. पंजाब किंग्ससोबतच्या आपल्या पहिल्याच हंगामात त्यांना फायनलपर्यंत नेणे सोपे नव्हते, पण श्रेयसने ते करून दाखवले. “श्रेयसला अनेकदा कमी लेखले जाते, पण तो एक असाधारण नेता आहे आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करतो,” असे कुंबळेने शेवटी म्हटले.

Comments are closed.