एमएस धोनीच्या रिटायरमेंटबाबत मोठी अपडेट! माजी क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्याने खळबळ

आयपीएल 2026 चा थरार सुरू व्हायला आता केवळ 2 आठवडे उरले आहेत, मात्र त्यापूर्वीच एमएस धोनीच्या (Mahendra Singh Dhoni’s Retirement Update) निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनी सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल, याची पुष्टी केली असली तरी, माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robbin uthappa on MS Dhoni) त्याच्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, धोनीसाठी हे आयपीएलचे शेवटचे वर्ष असू शकते. उथप्पाच्या मते, धोनी या हंगामात खेळाडू पेक्षा ‘मेंटॉर’ (मार्गदर्शक) म्हणून अधिक महत्त्वाची भूमिका बजावेल. उथप्पाने स्पष्ट केले की, तो धोनीला 7 व्या क्रमांकावर नाही, तर 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहत आहे.

यावेळी स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) देखील CSK संघात सामील झाला आहे. संजूच्या आगमनामुळे चेन्नईच्या संघात मोठे बदल होऊ शकतात आणि यामुळे धोनीवरील कामाचा ताण (Workload) कमी होण्याची शक्यता आहे. उथप्पापूर्वी माजी खेळाडू इरफान पठाणने देखील भाकीत केले होते की, 2026 नंतर धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स आणि आयपीएलची कल्पना करणे चाहत्यांसाठी खूप कठीण असेल, असेही त्याने नमूद केले.

2024 पासूनची आकडेवारी पाहिल्यास धोनी खूप खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे. 2025 च्या आयपीएलमध्ये तर त्याने दोनदा 9 व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती, जिथे सहसा गोलंदाज फलंदाजीला येतात. यावरून तो यावेळेसही फिनिशरच्या भूमिकेत अगदी शेवटच्या षटकांत दिसू शकतो.

Comments are closed.