अभिप्राय- संघर्षमय लेखणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> सिद्धेश शिगवण

कटाक्ष’ हा शब्द एकाच वेळी भावना, विचार आणि शरीराची ताकद या तिन्ही गोष्टींचा अर्थ सांगतो. प्रत्येक क्षेत्रात शिरलेलं राजकारण आणि गटबाजी हा आजकाल डोकेदुखीचा विषय झाला आहे. याचा त्रास प्रत्येक संवेदनशील आणि प्रामाणिक माणसाला होतो. तसा तो पत्रकार- लेखक जयंत माईणकर यांना झालेला आहे. त्यांचे कारकीर्दीतले वैयक्तिक अनुभवही फारसे सुखद नाहीत. ते त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडून काम करत राहिले हा भाग निराळा. वाईट अनुभव, त्यानंतर त्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आणि राजकारणाकडे बघण्याची त्यांची नजर हे सगळं कटाक्ष या एका शब्दात सामावलेलं आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर पत्रकार शैलेंद्र शिर्के यांनी केलेली मार्मिक टिप्पणी महत्त्वाची आहे. ते म्हणतात, माईणकरांना राजकीय वार्तांकनाचा मोठा अनुभव आहे. या अनुभवातून इतक्या वर्षांत टिपलेली त्यांची निरीक्षणे, नोंदी, बिनचूक संदर्भ सारे काही त्यांच्या या लेखांमध्ये मोकळेपणाने आले आहे. विविध वृत्तवाहिन्यांवर ठामपणे राजकीय मते मांडणारे माईणकर तितक्याच ताकदीने या लेखांतून ते व्यक्त होतात. हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांना अर्पण केले आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची प्रस्तावना लाभली आहे. माईणकरांनी पीटीआय, यूएनआय आणि रॉयटर्स अशा मोठय़ा वृत्तसंस्थांमध्ये काम केलं आहे. ज्या वेळी तंत्रज्ञान आजच्या इतकं अद्यावत झालं नव्हतं त्याकाळात टेलिप्रिंटरवर बातम्या यायच्या आणि कागदाच्या भेंडोळ्यांवर हवी असलेली बातमी शोधून कापून घेतली जायची. अशा काळात प्रत्यक्ष वृत्तसंस्थांमध्ये काम करणारे पत्रकार हे पायदळातल्या सैनिकांप्रमाणे युद्धपातळीवर काम करत असायचे. त्याला माईणकर अपवाद नाहीत. माईणकरांचे पुस्तकासाठी निवडलेले लेख त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनाबद्दल सांगतात.

राजकीय पत्रकारिता ही आणखी एक कठीण परीक्षा आहे. राजकीय घडामोडींचं वार्तांकन करताना पत्रकारांनी निष्पक्ष राहणं अपेक्षित असतं, पण प्रत्यक्षात पक्षीय दबाव, मालकांचे हितसंबंध आणि समाजातील तणाव यामुळे पत्रकारांना सत्य मांडताना अडचणी येतात. अशा वेळी प्रामाणिक पत्रकारांना त्रास होतो, त्यांच्यावर टीका होते आणि कधी कधी त्यांना बाजूला सारलं जातं. ही परिस्थिती संवेदनशील आणि प्रामाणिक पत्रकारांसाठी मोठं आव्हान आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, दबावाला न जुमानता सत्य मांडणं – हेच खरं पत्रकारितेचं बळ आहे. ‘कटाक्ष’ म्हणजे फक्त टीका नाही, तर अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणं. यात विचारांची धार, भावनांची प्रामाणिकता आणि संघर्षातून आलेली ताकद आहे.

पत्रकारितेची खरी ताकद ही लोकशाहीला आधार देण्यात आहे. कितीही राजकीय दबाव आला तरी पत्रकारांनी सत्य मांडण्याची जबाबदारी निभावली पाहिजे. `कटाक्ष’सारखी ठाम भूमिका घेतली तरच पत्रकारितेचा दर्जा टिकून राहील आणि समाजाला खरी दिशा मिळेल.

व्यंग

लेखक : जयंत माईणकर

संपादक व प्रकाशक : प्रज्ञा जांभेकर

प्रकाशन : सदमंगल प्रकाशन

पाने : 108  ह मूल्य : 300 रुपये

Comments are closed.