मोदींच्या रॅलीपूर्वी भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी.

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. गिरीश पार्क परिसरात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गर्दी पांगवण्यासाठी लाठीमाराचा वापर केला. या संघर्षादरम्यान आपल्यावर विट फेकण्यात आल्याचा दावा पश्चिम बंगालचे उद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री शशी पंजा यांनी केला. भाजप गुंड नाही, तर तो खुनी असल्याचा आरोपही त्यांनी केल्याने शाब्दिक युद्धही सुरू झालेले दिसत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी अतिरिक्त सैन्य तैनात केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील रॅलीपूर्वी शनिवारी राजकीय तणाव अचानक हिंसक संघर्षात रुपांतरित झाला. पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री डॉ. शशी पंजा यांच्या गिरीश पार्क परिसरातील निवासस्थानाभोवतीचा परिसर काही काळासाठी युद्धभूमीसारखा झाला होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलीस दल तैनात करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कोलकाता येथे दाखल होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. तरीही हा संघर्ष झाल्याने सुरक्षा यंत्रणांची बरीच तारांबळ उडाली होती.

गिरीश पार्कजवळ भाजप आणि तृणमूल काँग्रेस समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्यानंतर दगडफेकही झाली. या संघर्षादरम्यान, बहु बाजार पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर बप्पादित्य नास्कर जखमी झाले. त्यांच्या खांद्याला दगड लागल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण केले. प्रशासन सध्या सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काम करत आहे.

कार्यकर्त्यांना रोखल्याचा भाजपचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला जाणाऱ्या समर्थकांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ब्रिगेड परेड ग्राउंडकडे जाणाऱ्या भाजप समर्थकांना घेऊन जाणाऱ्या बसेस थांबवून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात रॅलीला जाणाऱ्या दोन बसेसची तोडफोड करण्यात आली, असे भाजपचे म्हणणे आहे. या संघर्षात काही कार्यकर्त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दगडफेकीत भाजप नेत्या तमघना घोषही जखमी झाल्या आहेत. गिरीश पार्कजवळ बस चालकावर हल्ला करण्यात आल्याचाही पक्षाचा दावा आहे.

मंत्र्यांच्या घरावर हल्ला : तृणमूल

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप समर्थकांनी मंत्री डॉ. शशी पंजा यांच्या गाडीवर आणि त्यांच्या घरावर हल्ला केला, असे तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे. घराच्या स्वागत कक्षाची तोडफोड करण्यात आली. तसेच दगडफेकीत बंगल्यातील काचेच्या खिडक्या तुटल्या. डॉ. शशी पंजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत डझनभराहून अधिक तृणमूल कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.