तब्बल 170 दिवसांनंतर सोनम वांगचुक तुरुंगातून बाहेर
‘एनएसए’ संबंधित गुन्हा मागे : अटक तात्काळ रद्द करण्याचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची अटक तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती 14 मार्च 2026 रोजी सरकारने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली. केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्यावर लादलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) रद्द केल्यामुळे ते तब्बल 170 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर त्यांच्या सुटकेचा हा आदेश तात्काळ लागू झाला आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीनंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 26 सप्टेंबर 2025 रोजी वांगचुक यांना हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले होते. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या अटकेचा अंदाजे अर्धा कालावधी पूर्ण केला होता.
सर्व भागधारकांशी सकारात्मक संवाद साधता यावा यासाठी लडाखमध्ये शांतता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. त्याचदृष्टीने योग्य विचारविनिमयानंतर, सोनम वांगचुक यांची अटक संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लडाखची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली जातील, असा पुनरुच्चार सरकारने केला. या प्रदेशाशी संबंधित प्रश्न संवाद आणि सहकार्याने सोडवले जातील अशी आशा व्यक्त केली.
Comments are closed.