कर्जमाफीबाबत संभ्रम; शासनाने स्पष्टता करावी, शेतकऱ्यांची मागणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच अर्थसकंल्पीय अधिवेशनात थकीत शेतकऱयांसाठी ‘अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर केली. यामध्ये दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. एकूणच या कर्जमाफीबाबत शेतकऱयांमध्ये संभ्रमावस्था असून, सरकारने स्पष्टता करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दोन लाखांच्या वर कर्ज असणाऱया शेतकऱयांसाठी या योजनेमध्ये काय आहे? त्यांना या कर्जमाफीमध्ये कसे बसवणार किंवा त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार, याबाबत सरकारने कुठलीच स्पष्टता न केल्याने शेतकऱयांमध्ये संभ्रमावस्था आहे. महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान शेतकऱयांचा सात-बारा कोरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफीची आस लागली.
कर्जमाफीच्या घोषणेची बळीराजा वाट पाहू लागला. त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली व शेतकऱयांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येईल, असे जाहीर केले.
थकबाकीत गेलेले कर्जमाफीत कसे बसणार?
n अहिल्यानगर जिल्हा हा साखर कारखान्याचा जिल्हा समजला जातो. त्यामुळे जिह्यात उसाचे मुबलक पीक असते. या पिकासाठी शेतकरी सहकारी सोसायटीमार्फत किंवा राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पीककर्ज घेत असतो. साधारणपणे पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱयांना सोसायटी किंवा बँका 3 लाखांपर्यंत पीककर्ज देतात. उसाला एकरासाठी 55 हजार कर्ज मिळते. 4 ते 5 एकर जमीन शेतकऱयाला असेल तर किमान दोन ते अडीच लाख रुपये पीककर्ज मिळते. हे कर्ज वेळेत न फेडू शकल्याने थकबाकीत गेले. पाच वर्षांत व्याजाचा डोंगर वाढल्याने हे कर्ज आजमितीला साडेचार लाखांवर गेले आहे. असे शेतकरी दोन लाखांच्या कर्जमाफीत कसे बसणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
… तर आत्महत्या वाढतच राहतील
n दोन लाखांच्या वर कर्ज असणाऱया शेतकऱयांनी काय करायचे, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. हा तिढा सुटण्यासाठी निवडणुकीत घोषणा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी करणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या बंद व्हाव्यात, असे जर वाटत असेल तर एकदा शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी देणे आवश्यक आहे; अन्यथा कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढतच राहणार, यात शंकाच नाही.
मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला
n दोन लाखांपर्यंत शेतकऱयांना कर्जमाफीची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द फिरवला आहे. सरसकट कर्जमाफीचा वचननामा देऊन फक्त दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. हे न करता अल्पभूधारक शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून पाच एकर जमीन असलेला व कमीतकमी पाच लाखांपर्यंतची कर्जमाफी करणे अवश्यक आहे. नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना एक लाख रुपये अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Comments are closed.