आयपीएल 2026 पूर्वी केकेआरसाठी आनंदाची बातमी; मॅच विनर खेळाडू फॉर्मात परतला!

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामाचा थरार सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले असून, सर्व फ्रँचायझींनी आपापली सराव शिबिरे सुरू केली आहेत. आयपीएल 2026 चा पहिला सामना 28 मार्च रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हंगामाच्या सुरुवातीला केकेआर आपल्या काही खेळाडूंच्या फिटनेस आणि फॉर्ममुळे चिंतेत होती, ज्यात हर्षित राणा (Harshit Rana) जवळपास स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र, त्यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे संघाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीन (Camron Green) आता आयपीएलच्या तोंडावर पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे.

नुकत्याच संपलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कॅमरन ग्रीनची बॅट आणि चेंडू दोन्हीकडून निराशाजनक कामगिरी झाली होती. तो गेल्या बराच काळ फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. वर्ल्ड कपवरून परतल्यानंतर ग्रीनने ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत ‘शेफील्ड शील्ड’ स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा त्याला फायदा झाला असून हंगामातील शेवटच्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी साकारली आहे.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याने न्यू साउथ वेल्स विरुद्ध नाबाद 130 धावांची खेळी केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेवटचे शतक ठोकणाऱ्या ग्रीनने या डावात आपले खाते उघडण्यासाठी 21 चेंडू घेतले, पण त्यानंतर प्रवेग वाढवत आपल्या खेळीत 5 षटकार ठोकले.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2026 च्या लिलावात कॅमेरून ग्रीनला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी 25.20 कोटी रुपयांची मोठी रक्कम खर्च केली होती. अशा परिस्थितीत, हंगाम सुरू होण्यापूर्वी ग्रीन फॉर्ममध्ये येणे ही केकेआरसाठी खूप मोठी बातमी आहे, ज्यामुळे त्यांच्या फलंदाजीला मोठी मजबुती मिळेल. मात्र, ग्रीन गोलंदाजी करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, कारण शेफील्ड शील्डच्या या सामन्यात त्याने गोलंदाजी केली नव्हती आणि टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याने फारशी गोलंदाजी केली नव्हती.

Comments are closed.