टी20 वर्ल्ड कप विजयी कॅप्टन सूर्याच्या घरी लवकरण हलणार पाळणा, पत्नी देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ जिंकत इतिहास रचला. यामध्ये भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले होते. आता या ऐतिहासिक विजयानंतर त्याच्या खाजगी आयुष्यातील एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सूर्यकुमार बाबा होणार असून लवकरच त्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्याची पत्नी देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाच्या (बेबी शॉवर) कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टी२० विश्वचषक सुरु असतानाच देविशा गर्भवती असल्याची माहिती समोर येत होती. आता या व्हिडिओने ते सिद्ध झाले आहे. त्यामुळे दोघांवरही चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सूर्या आणि देविशा यांच्या लग्नाला जवळ-जवळ १० वर्षे झाली आहेत.
या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार आणि देविशा यांनी अतिशय सुंदर पेहराव केला आहे. या खास कार्यक्रमासाठी सूर्याने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला असून देविशा पारंपरिक साडीमध्ये आहे. या कार्यक्रमात सूर्याने देविशाचा हात पकडत प्रवेश केला. या दोघांचे लग्न ७ जुलै २०१६ ला झाले होते. त्यावेळी सूर्यकुमार केवळ आयपीएलमध्ये खेळत होता. त्यानंतर त्याने पाच वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने टी२० विश्वचषक जिंकला. हा संघाचा सलग दुसरा आणि ऐतिहासिक तिसरा टी२० विश्वचषक ठरला. तो आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११३ टी२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४ शतके आणि २५ अर्धशतकांसह ३२७२ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३७ वनडे आणि एक कसोटी सामनाही खेळला आहे.
देविशा ही मूळची दक्षिण भारतीय कुटुंबातील असून तिने नेहमीच सूर्याकुमारला पाठींबा दर्शवला आहे. मग ते यश असो वा अपयश ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. मैदानावर त्याचा उत्साह वाढवण्यासाठी देविशा नेहमीच स्टेडियमवर उपस्थित असते. आता टी२० विश्वचषक विजयाचा आनंद आणि घरात येणारा नवीन पाहुणा अशा दुहेरी उत्साहात सूर्यकुमार आगामी आयपीएल हंगामात पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.
Comments are closed.