पूंछमध्ये ऑपरेशन दरम्यान सुभेदार शहीद
‘ऑपरेशन शेरी कलान’ दरम्यान अखेरचा श्वास : पथकाकडून हळहळ
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील पूंछ जिह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन शेरी कलान’ दरम्यान एक लष्करी सुभेदार हुतात्मा झाले. संबंधित लष्करी अधिकाऱ्याचे नाव सुभेदार संदीप कुमार ढाका असे आहे. लष्करी मोहिमेवेळी खडकाळ प्रदेशात कर्तव्य बजावताना घसरून पडल्यामुळे सुभेदार ढाका यांना हौतात्म्य प्राप्त झाले. सुभेदार ढाका यांच्या शौर्याचे संपूर्ण प्रदेशात कौतुक केले जात आहे. तसेच त्यांच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘ऑपरेशन शेरी कलान’ दरम्यान सुभेदार संदीप कुमार ढाका दुपारी अडीच वाजता सुरणकोट येथे ड्युटीवर होते. ते घसरून पडल्यानंतर बेशुद्ध झाले. त्यांना ताबडतोब पोथा येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे व्हाईट नाईट कॉर्प्सने रविवारी सांगितले.
भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि दक्षतेमुळे घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने हाणून पाडले जात आहेत. अलिकडच्या कारवायांमुळे दहशतवादी योजना उधळून लावण्यात येत आहे. हा काश्मीरच्या सुरक्षेसाठी एक सकारात्मक संकेत आहे. नियंत्रण रेषेवरील लष्कराचे गस्त आणि कारवाया वेळेवर रोखण्यासाठी अधिक मजबूत केले जात असतानाच राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेवेळी एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याला प्राण गमवावे लागले.
भारतीय सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. या दहशतवादविरोधी कारवाया केवळ सुरक्षा दलांच्या कृती दर्शवत नाहीत तर स्थानिक नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून काम करत असल्यामुळे या प्रदेशात शांततेची आशा देखील निर्माण झाली आहे.
Comments are closed.