दुबईतून श्रीमंतांचे पलायन, लंडनमध्ये घराची शोधाशोध; युद्धामुळे ब्रिटनच्या रिअल इस्टेट मार्केटला तेजी
अब्जाधीश, गर्भश्रीमतांची दुबई सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे. इराण-इस्रायलमधील युद्धाची झळ दुबईला बसली आहे. त्यामुळे दुबईतील आलिशान व्हिला आणि पेंटहाऊसमध्ये राहणारे पाश्चात्य नागरिक, विशेषतः ब्रिटिश अब्जाधीश आता तिथून काढता पाय घेत आहेत. या स्थलांतरामुळे सध्या लंडनच्या रिअल इस्टेट मार्केटला अचानक सुगीचे दिवस आले आहेत. वाट्टेल ती रक्कम देऊन दुबईतील श्रीमंत लोक लंडनमध्ये घर मिळवत आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील थेट संघर्ष व इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे दुबईतील सुरक्षिततेची खात्री आता श्रीमंतांना मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे जर युद्ध भडकले, तर दुबईतील विमानतळ आणि सागरी मार्ग विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी अनेक श्रीमंत ब्रिटिश कुटुंबांनी आपला मुक्काम दुबईतून हलवून पुन्हा लंडनकडे वळवला आहे. दुबईतून गेलेले श्रीमंत प्रवासी लंडनच्या पॉश भागांत घरांचा शोध घेत आहेत. मागणी अचानक वाढल्याने लंडनमध्ये घरांच्या भाडय़ाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. लंडनच्या पॉश भागात एका आठवडय़ाचे भाडे 3 ते 4 लाख रुपये मोजायला हे गर्भश्रीमंत तयार आहेत.
आठवडाभरात शिफ्टिंग
लंडन हे जगातील सर्वात स्थिर आणि सुरक्षित शहर मानले जाते. दुबईतील अनेक नागरिक तर इतके घाईत आहेत की, घराची पाहणी न करता केवळ फोटो पाहून एका आठवडय़ात लंडनमध्ये शिफ्ट होत आहेत. युद्धाच्या काळात सोन्यापेक्षाही लंडनसारख्या शहरातील मालमत्तेला जास्त किंमत मिळते. दुबईत राहणारे हजारो ब्रिटिश नागरिक आपल्या मूळ देशात परतणे अधिक सुरक्षित मानत आहेत.
Comments are closed.