'कांशीराम यांना भारतरत्न द्या'

राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. यासाठी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी यासंबंधीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली. ‘मी भारत सरकारला सामाजिक न्यायाचे महान योद्धा आणि बहुजन चेतनेचे मार्गदर्शक माननीय कांशीराम जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी करतो.’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या व्होट बँकेत प्रवेश करण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे तयार असल्याचे राहुल गांधी यांच्या या मागणीवरून दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे कांशीराम यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले होते. त्यानंतर रविवारी कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी त्यांना भारतरत्न देण्याची प्रमुख मागणी केली. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान केवळ कांशीरामजींनाच नव्हे तर लाखो बहुजनांना हक्क, प्रतिनिधित्व आणि स्वाभिमानाचा मार्ग मोकळा करणाऱ्या संपूर्ण चळवळीला खरी श्रद्धांजली ठरेल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मायावतींची डोकेदुखी वाढणार

कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी करून, राहुल गांधींनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधींच्या या कृतीमुळे मायावतींसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. कारण उत्तर प्रदेश हे असे राज्य आहे जिथे कांशीराम यांनी बसपाला एक प्रमुख राजकीय शक्ती बनवले होते. आता राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत मोठी मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कांशीराम यांनी 1984 मध्ये बसपाची स्थापना केली होती. उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर भागांमध्ये दलित आणि इतर मागासवर्गीय समुदायांना एकत्र आणण्याचे आणि एक मजबूत राजकीय मतपेढी निर्माण करण्याचे श्रेय त्यांना जाते.

Comments are closed.