UAE प्रशासनाकडून 35 जणांच्या अटकेचे आदेश; 19 हिंदुस्थानींच्या समावेशामुळे खळबळ, नेमकं कारण काय?

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करत आहे. या वाढत्या युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सोशल मीडियावर खोटी माहिती देणारे आणि चिथावणीखोर व्हिडीओ पसरवणाऱ्यांविरोधात संयुक्त अरब अमिराती (UAE) सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात युएईच्या अटॉर्नी जनरलनी तब्बल 35 जणांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. यामध्ये 19 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश आहे. आखाती देशांमधील परिस्थिती संवेदनशील असताना देशाची शांतता आणि स्थिरता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृत्याला थारा दिला जाणार नाही, असा सज्जड दमच प्रशासनाने दिला आहे.

ओरिजनल व्हिडीओसोबत छेडछाड

युएईची अधिकृत वृत्तसंस्था ‘वाम’ने दिलेल्या माहितीनुसार, अटॉर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्सी यांनी ही कारवाई केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींना तीन वेगवेगळ्या गटांत विभागण्यात आले आहे. पहिल्या गटातील 10 जणांनी क्षेपणास्त्र हल्ल्याच्या खऱ्या व्हिडीओंसोबत छेडछाड करून त्याला चुकीच्या माहितीसह पोस्ट केले असून लोकांमध्ये घबराट पसरवण्याचा प्रयत्न केला. यात ५ हिंदुस्थानी, 1 पाकिस्तानी, 1 नेपाळी, 2 फिलिपिनो आणि 1 इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे.

एआयचा वापर करून खोटे व्हिडीओ बनवणे

दरम्यान, हे व्हिडीओ बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून खोटे व्हिडीओ बनवणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 5 हिंदुस्थानी, 1 नेपाळी आणि 1 बांगलादेशी नागरिक असून, त्यांनी युएईमध्ये स्फोट आणि क्षेपणास्त्रे कोसळत असल्याचे बनावट व्हिडीओ तयार केले. इतकेच नव्हे तर हे व्हिडीओ खरे वाटावेत यासाठी त्यावर युएईचा ध्वज आणि तारखांचाही वापर केला होता. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला बदनाम करण्याचा हा कट प्रशासनाने उधळून लावला आहे.

शत्रू राष्ट्राच्या सैन्याचे आणि नेत्यांचे कौतुक

ज्यांनी युएईच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात जाऊन शत्रू राष्ट्राच्या सैन्याचे आणि नेत्यांचे कौतुक केले त्यांचा या गटात समावेश केला आहे. शत्रू राष्ट्रांचा सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्या 5 हिंदुस्थानींसह 1 पाकिस्तानी नागरिकावर ही कारवाई करण्यात आली आहे. युएई सरकारने आधीच इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांशी संबंधित कोणतेही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यावर कडक बंदी घातली होती. मात्र तरीही या लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे.

या गंभीर गुन्ह्यांसाठी युएईच्या कायद्यानुसार किमान एक वर्षाचा तुरूंगवास आणि 1 लाख दिरहम इतका मोठा दंड होऊ शकतो. हिंदुस्थानी दूतावासाने आधीच आपल्या नागरिकांना सोशल मीडियावर अशा प्रकारची कोणतीही माहिती किंवा व्हिडीओ शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, या सर्व आरोपींना तातडीने न्यायालयात पाठवण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

Comments are closed.