संघटनेपेक्षा कोणताही संघ मोठा नाही! टी-20 वर्ल्ड कप बहिष्कार नाट्यावर जय शहा यांचा इशारा
आयसीसी अध्यक्ष जय शहा यांनी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपूर्वी रंगलेल्या बहिष्कार नाटय़ावर भाष्य करत अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि बांगलादेश यांना स्पष्ट संदेश दिला. कोणताही संघ संघटनेपेक्षा मोठा नसतो, असे सांगत त्यांनी या वादावर प्रथमच आपली भूमिका मांडली.
टी-20 वर्ल्ड कपदरम्यान कथित सुरक्षेच्या कारणास्तव हिंदुस्थानात येण्यास नकार देत बांगलादेशने स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला. आयसीसीकडून सुरक्षेबाबत हमी दिली असतानाही बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि अखेर त्यांना स्पर्धेबाहेर करण्यात आले. त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाला संधी देण्यात आली. यानंतर बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्धच्या गट सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती, मात्र नंतर पाकिस्तानने आपली भूमिका बदलत सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शांत राहिलेल्या शहा यांनी आता या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केले.
मुंबईत झालेल्या इंडियन बिझनेस लीडर अवॉर्डस् कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले, ‘हा विश्वचषक अत्यंत महत्त्वाचा होता. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही संघ सहभागी होतील का आणि विश्वचषक कसा पार पडेल, याबाबत मोठी चर्चा होती. आयसीसी अध्यक्ष म्हणून मी इतकेच सांगू शकतो की कोणताही संघ संघटनेपेक्षा मोठा नाही. एक संघ मिळून संघटना तयार होत नाही, तर सर्व संघ मिळूनच ती तयार होते.’
Comments are closed.