“पाकिस्तान असोसिएट संघ बनत आहे”, बांग्लादेशविरुद्धच्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी खेळाडूची टीका

नुकतेच पाकिस्तानने बांग्लादेशविरुद्धची वनडे मालिका २-१ अशी गमावली. या मालिकेतील पाकिस्तानच्या कामगिरीवर त्यांचा एक माजी खेळाडू चांगलाच नाराज झाला आहे. अहमद शहजादने संघाच्या नेतृत्वावर टीका केली आहे. आणि पाकिस्तान क्रिकेटचा दर्जा घसरत असल्याचा इशारा दिला आहे.

या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी (१५ मार्च) ढाकामध्ये खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने ११ धावांनी गमावला. या पराभवानंतर शहजादने त्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामध्ये त्याने कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी आणि मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांच्यावर टीका केली आहे. संघातील समस्या सोडवण्याऐवजी कारणे सांगत असल्याचा त्याने आरोप केला आहे.

शहजादने त्याच्या यूट्युब चॅनलवर म्हटले, “टी२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर तुम्ही कोणतेही बदल केले नाहीत. तुम्ही काहींना अचानक बाहेर काढले. आता तुम्ही मालिका गमावली आणि त्यासाठी कोणाला दोषी ठरवता, तर संघात घेतलेल्या युवा खेळाडूंना.”

“जेव्हा तुम्ही तुमच्या चुका स्विकारत नाही, तेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही,” असेही शहजादने पुढे म्हटले आहे.

या मालिकेसाठी पाकिस्तानने अनुभवी बाबर आझम आणि फखर जमान यांना संघातून वगळले. त्यांना आराम दिल्याचे कारण हेसन यांनी सांगितले होते, तर मुख्य निवडकर्ता आकिब जावेद यांनी त्या दोघांना टी२० विश्वचषकात दुखापत झाल्याचा दावा केला होता. शहजादने पाकिस्तानच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने मालिका निर्णायक सामन्यात आफ्रिदीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर आश्चर्य व्यक्त केले.

त्याबद्दल शहजाद म्हणाला, “जेव्हा तुम्ही नाणेफेक जिंकली, तेव्हा तुम्ही गोलंदाजी का घेतली? ती एक चांगली खेळपट्टी होती. तुम्ही प्रथम फलंदाजी करायला हवी होती आणि नंतर प्रकाशात गोलंदाजी करायला हवी होती. तुमचे वरिष्ठ खेळाडूच असे निर्णय घेतात, तेव्हा युवा खेळाडूंकडून काय अपेक्षा करावी?”

“तुम्ही म्हणता तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला हरवले आहे, मात्र त्यांनी कधीही त्यांच्या पूर्ण ताकदीच्या संघाविरुद्ध खेळले नाही. तुम्ही असोसिएट संघ बनत आहात. लोक आता पाकिस्तानला झिम्बाब्वेसारखे वागवत आहेत आणि तुम्ही म्हणता रनरेटमुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडलो, असेही शहजादने पुढे म्हटले आहे.

तिसऱ्या सामन्यात बांग्लादेशच्या तंजिद हसनने शतकी खेळी केली. त्यामुळे बांग्लादेशने ५ विकेट्स गमावत २९० धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानकडूनही एक शतकी खेळी केली गेली. सलमान आगाने १०६ धावा केल्या, मात्र त्यांना २७९ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आला. बांग्लादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

Comments are closed.