America Israel- Iran War- नो, न्हाय, नेव्हर! अमेरिकेचं आवाहन जपान, ऑस्ट्रेलियाने धुडकावून लावलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा 17 वा दिवस असून याचा सर्वाधिक फटका ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या सागरी मार्गाला बसला आहे. त्यामुळे येथील जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मार्ग पुन्हा मोकळा करण्यासाठी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू’ असा प्रस्ताव कच्चे तेल ग्राहक देशांना दिला आहे. मात्र, अमेरिकेचे जवळचे मित्र असलेल्या जपान आणि ऑस्ट्रेलियाने या युद्धग्रस्त भागात आपली युद्धनौका पाठवण्यास सध्या तरी स्पष्ट नकार दिला आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, आशियाई आणि युरोपीय देश या जलमार्गावर अवलंबून आहेत, त्यामुळे तो सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. ट्रम्प यांनी चीन, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या देशांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर चीनने मदत न केल्यास या महिन्याच्या शेवटी होणारा आपला बीजिंग दौरा ट्रम्प पुढे ढकलू शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी याबाबत भाष्य केले. जपानच्या संविधानातील मर्यादांमुळे ते मध्यपूर्वेत सुरक्षा पुरवण्यासाठी आपल्या नौदलाची जहाजे पाठवू शकत नाहीत. ऑस्ट्रेलियानेदेखील आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली. ते म्हणाले की, त्यांना अद्याप अशी कोणतीही अधिकृत विनंती मिळालेली नाही आणि ते तिथे सैन्य पाठवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ही इराण आणि ओमानच्या दरम्यान असून ती जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ट्रम्प यांच्या या मागणीमुळे आणि मित्रराष्ट्रांच्या नकाराने या भागात पुन्हा एकदा राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवरही होऊ शकतो.

America Israel- Iran War- होर्मुझमध्ये ‘पेट्रोलिंग’साठी ट्रम्प यांना हवी इतर देशांची मदत, केलं एकत्रं येण्याचं आवाहन

Comments are closed.