“मला तो विक्रम मोडायचा आहे,” वैभव सूर्यवंशीची क्रिस गेलच्या ‘या’ आयपीएल रेकॉर्डवर नजर

वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ सुरू होण्याआधी टी२० च्या इतिहासातील एका मोठ्या विक्रमावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या हंगामात वयाच्या अवघ्या १४व्या त्याने या लीगमध्ये पदार्पण केले. तो राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. त्याने सात सामन्यांत २५२ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट २०० पेक्षा अधिक राहिला आहे. पहिला हंगाम गाजवल्यानंतर वैभव आता २०२६ मध्येही उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. त्याने बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान क्रिस गेलचा मोठा विक्रम मोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
वैभवने या वर्षाच्या सुरूवातीला आयसीसी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १७५ धावांची खेळी केली होती. त्याच्या या जबरदस्त खेळीमुळे भारताने सहाव्यांदा ऐतिहासिक विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली होती.
रविवारी (१५ मार्च) दिल्लीमध्ये पार पडलेल्या बीसीसीआय नमन पुरस्कार सोहळ्यात क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी वैभवला विचारले, “तुला कोणता विक्रम मोडायचा आहे? एका षटकात सहा षटकाराचा, आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा किंवा गेलच्या प्रसिद्ध १७५ धावांचा?”
त्यावर वैभवने उत्तर दिले, “सर, मला १७५ धावांचा विक्रम मोडायचा आहे.”
आयपीएलच्या इतिहासात क्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनीच एका सामन्यात १५० पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे. तसेच यामध्ये भारतीय फलंदाजांकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे. त्याने सनरायझर्स हैद्राबादकडून खेळताना पंजाब किंग्जविरुद्ध ५५ चेंडूत १४१ धावा केल्या होत्या.
गेलने २०१३च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती. ती आयपीएल आणि टी२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.
कार्यक्रमावेळी वैभवला त्याच्या वैयक्तिक ध्येय्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “या हंगामात मला संघासाठी विजेतेपद जिंकायचे आहे. मला चांगली कामगिरी करायची आहे आणि संघाच्या विजयात योगदान द्यायचे आहे.”
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थानचे नेतृत्व रियान पराग करणार आहे.
Comments are closed.