‘मी मनाचं ऐकलं आणि…’; ईशान किशनच्या टीम इंडियातील निवडीबाबत सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा!

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटले आहे की, ‘पॉवर हिटर’ ईशान किशनला टी-२० विश्वचषक संघात निवडण्याचा निर्णय पूर्णपणे ‘मनाच्या आवाजावर’ (inner voice) घेतला होता. कारण बिहारच्या या फलंदाजामध्ये असा ‘एक्स फॅक्टर’ आहे, जो सामन्यांमध्ये निर्णायक ठरू शकतो, असे सूर्याला वाटले होते. रविवारी पीटीआय (PTI) व्हिडिओला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत सूर्यकुमारला विचारण्यात आले होते की, तो आकडेवारीवर चालणारा कर्णधार आहे की मनाचा आवाज ऐकतो? तसेच जितेश शर्माच्या ऐवजी ईशानच्या निवडीमागे काय कारण होते? विशेष म्हणजे, ईशान किशन या स्पर्धेत भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

​भारताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. ‘सूर्या अँड कंपनी’ संपूर्ण स्पर्धेत केवळ एकच सामना हरली. पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात ईशान किशनने स्फोटक अर्धशतक झळकावले होते. ईशान किशनबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “हा निर्णय पूर्णपणे मनाच्या आवाजावर घेतला होता. त्यावेळी जितेश शर्मासाठी हे खूप कठीण होते कारण तो वर्षभरापासून संघासोबत होता. तो खेळतही होता, जर तो खेळला नसता तर गोष्ट वेगळी असली असती.”

​८ मार्च २०२६ रोजी भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार सूर्यकुमारने आपल्या कारकिर्दीबद्दल, भारतीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघासोबतच्या आपल्या संबंधांवर सविस्तर भाष्य केले. आपली फलंदाजी ही परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया आणि सहजता (instinct) यांचा मिलाफ असल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, “जितेशला वगळून ईशानची निवड करताना मलाही खूप वाईट वाटले होते, पण आम्हाला अशा सलामीवीराची गरज होती जो वरच्या फळीत आक्रमक खेळ करू शकेल. अशा परिस्थितीत कोणालातरी बाहेर राहावेच लागणार होते.”

​ईशान संघात कसा आला, याबद्दल सांगताना सूर्या म्हणाला की, त्याने ईशानला फोन करून विचारले, “छोटू, विश्वचषक जिंकवून देशील का?” त्यावर ईशानने उत्तर दिले, “विश्वास ठेवणार का?” तेव्हा सूर्यकुमार म्हणाला, “चल, ठेवला!” सूर्यकुमार पुढे म्हणाला की, “ईशानने केलेली कामगिरी अप्रतिम होती. मला नेहमीच वाटायचे की तो ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतो कारण त्याच्यावर कोणतेही दडपण नव्हते.” ईशान खराब फॉर्ममधून जात होता आणि संघाबाहेर होता, पण खेळात टिकून राहण्यासाठी त्याने संपूर्ण भारतात छोटे-छोटे सामने आणि सराव सामने खेळले, असेही सूर्याने नमूद केले.

​ईशानने आपल्या कर्णधाराला निराश केले नाही आणि नऊ सामन्यांमध्ये १९० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ३१७ धावा केल्या. घरगुती क्रिकेट न खेळल्यामुळे संघातून डच्चू मिळाल्यानंतर, राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी ईशानने दाखवलेल्या बांधिलकीचे ३५ वर्षीय सूर्यकुमारने कौतुक केले. ईशानने इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य फेरीत १८ चेंडूत ३९ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकले होते.

Comments are closed.