IPL 2026: साडेतीन तासांचा नवा नियम! सर्व फ्रँचायझींसाठी बीसीसीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२६ सुरू होण्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामधून त्यांनी सर्व १० संघांना एकप्रकारचा कडक इशारा दिला आहे. बीसीसीआयने संघांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सराव सत्रे आणि सराव सामन्यांसाठीचा विशिष्ट नियमांचा समावेश आहे, ज्यामुळे यजमान संघ घरच्या मैदानावरील परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही.

बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार सर्व संघांना तयारीसाठी समान संधी मिळेल. सामन्यांच्या खेळपट्ट्यांचा दर्जा कायम राहील. महत्वाचे म्हणजे बीसीसीआयने फ्लडलाईट्सखाली होणाऱ्या सरावासाठी वेळेची मर्यादाही निश्चित केली आहे. या नियमांचे पालन न केल्यास नुकसान होईल, कारण बीसीसीआय या मार्गदर्शक तत्वांची कठोरपणे अमंलबजावणी करेल.
या नियमांवरून बीसीसीआयचा भर निष्पक्षता आणि खेळपट्टीच्या रक्षणावर आहे.

फ्रॅंचायजी जास्तीत जास्त दोन सराव सामने खेळू शकतात, त्यासाठी मात्र त्यांना बीसीसीआयची परवाणगी आवश्यक आहे. तसेच हे सामने मुख्य खेळपट्टीवर खेळले जाणार नाहीत. जर तो सराव सामना फ्लडलाईट्सच्या प्रकाशात खेळला जात असेल तर संपूर्ण सामना साडेतीन तासांपेक्षा अधिक काळ खेळता येणार नाही.

सराव सत्रादरम्यान, एखादा संघ दुसऱ्या संघाने आधीच वापरलेली खेळपट्टी वापरू शकणार नाही. जर संघांनी एकापाठोपाठ एक सराव केला, तर त्यांना नवीन खेळपट्टी दिली जाईल. तसेच प्रत्येक संघाला नेमून दिलेल्या सराव सत्रासाठी नवीन नेट्स उपलब्ध करून देण्यात येईल. जर एक संघ आधी सराव करत असेल, तर दुसऱ्या संघाला त्यांची रेंज-हिटिंग विकेट वापरण्याची परवानगी नाही.

त्याचबरोबर फ्रॅंचायजीला पहिल्या घरच्या सामन्याच्या चार दिवस आधी प्रमुख स्क्वेयरमध्ये सराव सत्र किंवा सामने खेळता येणार नाहीत. आवश्यक असल्यास पर्यायी मैदाने उपलब्ध करून दिली जातील.

वरील नियम कोणताही संघ खेळपट्टीचा गैरफायदा घेऊ नये आणि सर्वांना तयारीसाठी समान वेळ मिळावा, यासाठी तयार केले आहेत. काही संघांकडून खेळपट्टीचा अतिवापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याच्या परिणाम सामन्यांवर झाला होता. हे रोखण्यासाठी बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत.

बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे यजमान संघाबरोबर पाहुण्या संघालाही समान संधी मिळणार आहेत. आयपीएल २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरु होत आहे. यामध्ये पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Comments are closed.