पत्नीचा तो एक प्रश्न आणि सूर्याचं नशीबच पालटलं! टी20 वर्ल्ड कप विजयानंतर सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा

च्या'मिस्टर 360 डिग्री' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावले. यासह भारतीय संघ सलग दोनदा टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी सूर्यकुमार २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. दोनदा विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार सूर्याने एक मोठा खुलासा केला आहे. आपली पत्नी देविशाच्या एका प्रश्नाने आपले नशीब आणि करिअर कसे बदलले, हे त्याने सांगितले आहे.
ही गोष्ट २०१८ सालची आहे, जेव्हा सूर्यकुमार यादव देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत होता, परंतु भारतीय संघात त्याला स्थान मिळत नव्हते. अशा वेळी त्याची पत्नी देविशाने सूर्याची दिनचर्या जवळून पाहिली आणि एके दिवशी स्पष्टपणे विचारले- “तुझ्या सोबतचे अनेक खेळाडू भारतासाठी खेळत आहेत, तुझा काय विचार आहे? जर तुला भारतासाठी खेळायचे असेल, तर ते कसे खेळणार?” सूर्याने सांगितले की, त्या एका प्रश्नाने मला पूर्णपणे हलवून सोडले. त्यानंतर आम्ही ठरवले की आता गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतील.
’पीटीआय व्हिडिओ’ सोबतच्या एका पॉडकास्टमध्ये त्या संभाषणाची आठवण करून देताना सूर्यकुमार म्हणाला, “आमचे लग्न २०१६ मध्ये झाले होते, जेव्हा मी केकेआर (KKR) कडून खेळत होतो. सर्व काही खूप सहजपणे सुरू होते. मी चांगले खेळत होतो आणि खेळाचा आनंद घेत होतो. २०१८ मध्ये जेव्हा मी मुंबई इंडियन्समध्ये सामील झालो, तेव्हा तिने माझा आतापर्यंतचा प्रवास आणि दिनचर्या पाहिली. मला वाटते त्यानंतरच आम्ही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने करायला सुरुवात केली होती.”
सूर्या पुढे म्हणाला की, “आम्ही अनेक गोष्टींमध्ये कपात केली. आमचा आहार, मित्रांसोबत वेळ घालवणे, शनिवार-रविवारची विश्रांती आणि सोमवार ते शुक्रवार कामाचे वेळापत्रक यात बदल केला. २०१८ मध्ये मी आयपीएलचा एक चांगला सीझन खेळलो (५१२ धावा) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली. त्यावर्षी मला मुंबई इंडियन्ससाठी सलामीला (Open) खेळण्याची संधी मिळाली आणि मी धावा देखील केल्या.”
तो पुढे म्हणाला, “२०१९ आणि २०२० मध्ये आम्ही तेच काम सुरू ठेवले आणि मी एका वेगळ्याच मनःस्थितीत होतो. माझी पत्नी देविशाने पाहिले की मी खेळाचा अधिक आनंद घेत आहे. २०२० चा सीझन तर आणखी चांगला होता (फिनिशर म्हणून ४८० धावा) आणि त्यानंतर २०२१ मध्ये माझी भारतीय संघात निवड झाली.”
भारतीय टी-२० कर्णधार सूर्याने पुढे सांगितले की, देविशा नेहमीच पडद्यामागे राहून त्याची ताकद बनली आणि त्याच्या यशात तिने मोलाचे योगदान दिले. त्याने स्पष्ट केले की देविशाने त्याच्या क्रिकेटमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही कारण ते तिचे क्षेत्र नव्हते, परंतु तिने त्याला क्रिकेटव्यतिरिक्त इतर जीवनाबद्दल मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला, “मी याचे पूर्ण श्रेय तिला देतो कारण तिने मला केवळ क्रिकेटमधील करिअरबद्दलच नाही, तर जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. मला काय करावे? एखाद्या विशिष्ट परिस्थितीचा सामना कसा करावा? आणि मी स्वतःला कसे सादर करावे? याबद्दल तिने मला मार्गदर्शन केले.”
Comments are closed.