तरी हिंदूंना भीती असेल तर, तुम्ही सरकारमधून बाहेर व्हा, आम्ही जबाबदारी घेतो; अनिल परब यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
“प्रत्येकाने आपला धर्म अभिमानाने जपलाच पाहिजे, मात्र सध्या देशात आणि राज्यात धर्मरक्षक फार वाढले आहेत. त्यांना असे वाटते की धर्म केवळ त्यांच्यामुळेच चालला आहे. जर राज्यात तुमचे सरकार असतानाही खुद्द मंत्रीच हिंदूंना भीती आहे असे म्हणत असतील, तर तुम्ही सत्तेतून बाहेर व्हा; हिंदूंचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेतो,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
विधानपरिषदेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “प्रत्येकाने स्वतःचा धर्म अभिमानाने जपला पाहिजे. परंतु हल्ली धर्मरक्षक खूप झाले आहेत. त्यांना असं वाटतं धर्म त्यांच्यामुळे चालला आहे. सरकरचा एक मंत्री म्हणतोय हिंदूना भीती आहे. जर तुम्ही सरकारमध्ये आहात आणि तरीही हिंदूंना भीती असेल तर तुम्ही सरकारमधून बाहेर व्हा, आम्ही जबाबदारी घेतो तुमचं रक्षण करण्याची.”
अनिल परब म्हणाले की, “हिंदूंचं सरकार असूनही आपण घाबरत असू तर हिंदूंना रक्षण देण्यासाठी आपण कमजोर आहात असं मला वाटतेय. तुम्ही जेव्हा कायदा करता तेव्हा त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. धर्मरक्षकाची व्याख्या काढून टाका. जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला जशी शिक्षा आहे, तशी धर्म रक्षणाच्या नावाखाली दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर अन्याय करणाऱ्यालाही शिक्षा व्हायला हवी. धर्मरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. कोणाही टग्याची, धर्मरक्षकाची नाही.”
Comments are closed.