हरियाणात भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली

दहा राज्यांमधील राज्यसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मतदानाच्या गुप्ततेसंबंधीचा मुद्दा उपस्थित झाल्याने प्रलंबित राहिलेली हरियाणाच्या राज्यसभा निवडणुकीची मतगणना मंगळवारी पूर्ण करण्यात आली असून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांना अपेक्षेप्रमाणे प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय भाटिया आणि काँग्रेसचे उमेदवार करमवीर सिंग बौध हे या निवडणुकीत यशस्वी ठरले आहेत.

अशा प्रकारे 10 राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या फेरीत 37 जागा होत्या. त्यांच्यापैकी 22 जागा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या आहेत. तर 16 जागांवर विरोधकांना यश मिळाले आहे. या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बळ राज्यसभेत वाढले असून आता या आघाडीकडे या सभागृहात 17 सदस्यांचे बहुमत निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्येही वाढ झाली आहे.

काय घडले हरियाणात…

हरियाणात 16 मार्चला राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान झाले होते. सोमवारीच संध्याकाळी मतगणनेला प्रारंभ झाला होता. तथापि, काँग्रेसच्या दोन सदस्यांनी आपली मते अनधिकृत व्यक्तीला दाखविल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने नोंदविला. तर भारतीय जनता पक्षाचे राज्यातील मंत्री अनिलकुमार विज यांनी मतदान केल्यानंतर ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिली. ही घोषणा नियमबाह्या आहे, असा आक्षेप काँग्रेसने नोंदविला. ही मते रद्द करण्यात यावीत. असा आग्रह दोन्ही पक्षांनी परस्परांविरोधात धरला. त्यामुळे मतगणना प्रक्रिया थांबविण्यात आली. परिणामी, सोमवारी निर्णय घोषित होऊ शकला नाही. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले. आयोगाने या प्रकरणाचे निराकरण केल्यानंतर मंगळवारी दुपारी मतगणनेला प्रारंभ करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा एक, तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. हरियाणात काँग्रेसच्या एकाही सदस्याचे मत फुटल्याचे दिसून आले नाही, ही बाब त्या पक्षासाठी दिलासादायक ठरली. बिहार आणि ओडीशामध्ये मात्र, काँग्रेसच्या अनुक्रमे 3 आणि 4 सदस्यांनी पक्षाविरोधात पावले उचलल्याने काँग्रेसची कोंडी झाली होती. काँग्रेसने मते फुटल्याने या निवडणुकीत दोन जागा गमावल्या आहेत.

सैनी यांच्याकडून अभिनंदन

हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसला आपले आमदार सांभाळता येत नाहीत. भारतीय जनता पक्षावर याचे खापर तो पक्ष फोडत आहे. काँग्रेसला सतत आपले आमदार फुटण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्या पक्षाने आपल्या आमदारांना बंदिस्त केले होते. तसेच दर तासाला आमदारांचे वास्तव्याचे स्थान बदलण्यात येत होते. यावरुन काँग्रेसचे नेतृत्व किती धास्तावले होते, हे दिसून येते, अशी टीका नायाब सिंग सैनी यांनी काँग्रेसवर केली. भारतीय जनता पक्षाने आपला प्रभाव आणखी एकदा दाखवून दिला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Comments are closed.