IPL 2026: धोनीच्या जागी संजू करणार विकेटकीपिंग, नेतृत्वाचीही जबाबदारी? सीएसकेच्या प्लॅनबाबत कुंबळेंचे मत

भारताच्या टी२० विश्वचषक २०२६ च्या विजयामध्ये महत्वाची कामगिरी केल्यानंतर संजू सॅमसन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामात एका नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. आयपीएल २८ मार्चपासून सुरू होत आहे. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळल्यानंतर स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू चेन्नई सुपर किंग्जमध्ये (सीएसके) सामील झाला आहे. संघात एमएस धोनी असून विकेटकीपर म्हणून संजूच्या संधीवर त्याचा परिणाम होऊ शकतो की नाही हे कळेलच.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचायजीसोबत जोडले गेल्याने संजूसाठी अपेक्षा आणि संधी दोन्ही निर्माण झाल्या आहेत. तसेच त्याला त्याचा खेळ उंचावण्यासाठी एक व्यासपीठही मिळाले आहे. चेपॉकमधील परिस्थितीशी जुळवून घेणे हे एक नवीन आव्हान असणार आहे. त्याचे आगमन हे सीएसकेला अधिक मजबूत बनवेल असे मत भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.
“आयपीएलआधी त्याचा उत्तम फॉर्म आणि सलग तीन मोठ्या खेळी करत भारताला विश्वचषक जिंकून देणे हे तर अधिकच उत्तम ठरले. क्रिकेटमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जबाबदाऱ्या जात राहिल्या. सुनील गावस्कर यांच्यापासून सचिन, मग विराट कोहलीपर्यंत आणि धोनीही त्याच्याच एक भाग आहे. सध्या उत्तम कामगिरी करणारे धोनी आणि विराटआधी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासारखे खेळाडू होते. त्यामुळेच संजूचे सीएसकेमध्ये येणे हा एक चांगला निर्णय आहे.,” असे कुंबळे सीएसकेच्या संजूला संघात घेण्याच्या निर्णयाबाबत म्हणाले आहेत.
कुंबळे म्हणाले, “संजूच्या संघात येण्याने सीएसकेच्या चाहतावर्ग आणखी वाढेल. कारण तो केरळमध्ये जन्मलेला असून तमिळ बोलतो यामुळे एक प्रकारचे नाते तयार होते. त्याचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरेल.”
“संघात ऋतुराज असूनही संजूला घेतले आणि तो कर्णधार म्हणून कायम राहणे चांगली गोष्ट आहे. तसेच या हंगामात कधीतरी धोनी विकेटकिपींगची जबाबदारी संजूला देईल तर मला आश्चर्य वाटणार नाही. दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे ऋतुराज उपलब्ध नसला तर धोनीऐवजी संजू नेतृत्वाची जबाबदारी स्विकारेल”, असेही कुंबळे यांनी पुढे म्हटले आहे.
संजूच्या येण्याने पाच वेळेचा आयपीएल विजेत्या सीएसके संघात मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे.
Comments are closed.