पॅट कमिन्स जखमी; इशान किशनकडे कर्णधारपद, तर अभिषेक शर्मावर सोपवली मोठी जबाबदारी!

आयपीएलच्या नवीन हंगामाच्या सुरुवातीपूर्वी सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) मोठी घोषणा करण्यात आली आहे. टीमचा कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे, तर त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन संघाचे नेतृत्व करताना दिसेल. याचसोबत, धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्माकडे संघाने उपकर्णधारपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक शर्माचे नाव कर्णधारपदासाठी आघाडीवर होते, परंतु इशानचा सध्याचा फॉर्म आणि त्याचा नेतृत्वाचा अनुभव लक्षात घेता त्याला ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची धुरा पॅट कमिन्स सांभाळतो. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०२४ च्या फायनलमध्ये धडक मारली होती, मात्र जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले होते. कमिन्सच्या नेतृत्वाखाली हा संघ पूर्णपणे बदललेला पाहायला मिळाला आहे. मात्र, दुखापतीमुळे तो यंदा सुरुवातीच्या सामन्यांत खेळू शकणार नाही. सध्या तो पाठीच्या त्रासाने (Back Injury) त्रस्त आहे. याच कारणामुळे तो टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नव्हता, तर ॲशेस मालिकेतही त्याला केवळ एकच सामना खेळता आला होता.
इशान किशन सध्या बॅटने जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने टीम इंडियासाठी टी-२० वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करत विजयात मोलाचे योगदान दिले होते. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. यापूर्वी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडचे नेतृत्व करताना विजेतेपद मिळवून दिले होते. याचबरोबर, टीम इंडियामध्ये दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुनरागमन करताना तो तुफानी फलंदाजी करताना दिसला आहे.
Comments are closed.