'जग लाडकी' जहाज गुजरातमध्ये दाखल

युएईमधून 80,886 मेट्रिक टन कच्चे तेल पोहोचले : भारताच्या ‘ऑपरेशन संकल्प’ला मोठे यश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय ध्वज असलेले तेलवाहू जहाज ‘जग लाडकी’ गुजरातच्या मुंद्रा येथील अदानी पोर्टवर दाखल झाले आहे. ते संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) फुजैरा बंदरातून होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून आले आहे. या जहाजात 80,886 मेट्रिक टन (अंदाजे 5.80 ते 6.0 लाख बॅरल) कच्चे तेल आहे. भारताला दररोज अंदाजे 5.5-5.6 दशलक्ष बॅरल (अंदाजे 90 कोटी लिटर) तेलाचा वापर होतो.

‘जग लाडकी’ हे कार्गो जहाज संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैरा बंदरावर तेलसाठा भरून पाठण्यात आले आहे. या जहाजाची लांबी 274.19 मीटर आणि रुंदी 50.04 मीटर आहे. या टँकरचे डेडवेट टनेज (एकूण भार वाहून नेण्याची क्षमता) अंदाजे 1,64,716 टन आणि ग्रॉस टनेज अंदाजे 84,735 टन आहे.

भारतात यापूर्वी 16 आणि 17 मार्च रोजी दोन भारतीय ध्वजांकित एलपीजी वाहक जहाजे दाखल झाली होती. भारतात दाखल होण्यापूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे ती पार झाली होती. एमटी शिवालिक आणि एमटी नंदा देवी या जहाजांमधून अंदाजे 92,712 मेट्रिक टन एलपीजी घेऊन होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला होता. आपल्या व्यावसायिक हितांचे रक्षण करण्यासाठी, भारत ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत या प्रदेशातील पाण्यात सतत नौदल उपस्थिती राखतो. हा उपक्रम महत्त्वाच्या सागरी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी आणि ‘जग लाडकी’सारख्या जहाजांना सुरक्षित मार्ग मोकळा करून देण्याची खात्री करण्यासाठी समर्पित आहे.

संयुक्त राष्ट्रांची सागरी संघटना बैठक घेणार

संयुक्त राष्ट्रांची सागरी संघटना (आयएमओ) आखाती प्रदेशातील परिस्थितीवर लवकरच एक तातडीची बैठक घेणार आहे. युद्धामुळे जहाजे आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अनेक देश सहभागी होणार असून, मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. इराणचे हल्ले आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रयत्नांचा निषेध व्हावा, अशी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि आखाती देशांची इच्छा आहे. दरम्यान, जपान, पनामा, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांना अडकलेली जहाजे आणि खलाशी यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक योग्य योजना तयार व्हावी असे वाटते. दुसरीकडे, या परिस्थितीसाठी अमेरिका आणि इस्रायल जबाबदार असल्याचे इराणचे म्हणणे आहे. समुद्रातील वाढलेल्या धोक्याला इस्रायल आणि अमेरिका कारणीभूत असल्याचा आरोप इराणने वेळोवेळी केलेला आहे.

Comments are closed.