दिल्लीत अपार्टमेंटला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू.

मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी आगीची एक भीषण दुर्घटना घडली. नैऋत्य दिल्लीतील पालम भागातील चार मजली अपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याने तीन मुलांसह किमान 9 जणांचा मृत्यू झाला. इतर काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानात सकाळी 6:30 च्या सुमारास आग लागली. आग झपाट्याने पसरत वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. त्यावेळी इमारतीत सुमारे 18 जण होते. अचानक लागलेल्या आगीमुळे घबराट पसरली. काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यांवरून उड्या मारल्या, तर आगीमुळे बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्याने इतर अनेक जण आत अडकले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळघरात आणि तळमजल्यावर एक ब्युटी पार्लर, बांगड्यांचे दुकान आणि इतर छोटे व्यवसाय होते, तर वरच्या मजल्यांवर काही कुटुंबे राहत होती.अग्निशमन दलाला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद देत सुमारे 30 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या. अग्निशमन दलाचे जवान मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान दिल्ली पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचावकार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी संपूर्ण परिसर सील केला होता. याव्यतिरिक्त, जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका आणि केंद्रीकृत अपघात व आघात सेवेच्या वैद्यकीय पथकांनाही तैनात करण्यात आले होते.

Comments are closed.