नोएडा विमानतळाचे 28 तारखेला उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांची मुख्य उपस्थिती : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

वृत्तसंस्था/ नोएडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मार्च रोजी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी आपल्या सरकारच्या नऊ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित एका समारंभात ही घोषणा केली. या माध्यमातून देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्यात सध्या 16 देशांतर्गत आणि चार आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. नोएडा-जेवर येथील विमानतळ हे राज्यातील पाचवे आणि देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. जेवर विमानतळाला उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘गेम-चेंजर’ संबोधून मुख्यमंत्र्यांनी यातून भविष्यात 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थिती बुधवारी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचा तपशील देणाऱ्या एका पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.   या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत राज्यात झालेले सर्व बदल हे पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर भर देताना ते म्हणाले की, आज रमजानचा महिना आहे. लवकरच ईद येणार आहे, तरीही कुठेही अशांतता किंवा दंगलीची भीती नाही. हेच सुशासन आहे. 2017 पूर्वी पोलीस भरती थांबली होती, परंतु त्यांच्या सरकारने पारदर्शकपणे 2.19 लाख पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली आहे आणि सध्या 60,240 कर्मचारी प्रशिक्षण घेत असल्याचेही ते म्हणाले.

मागील सरकारांवर टीका करताना ते म्हणाले की, काही लोक नोएडाला जायला घाबरत होते, पण त्यांच्या सरकारने तिथे जाऊन गुंतवणुकीचे वातावरण निर्माण केले. आज देशातील 55 टक्के मोबाईल फोन नोएडामध्ये तयार होतात. उत्तर प्रदेशात आता 16 देशांतर्गत आणि 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांचे जाळे असून, जेवर हे पाचवे आणि सर्वात मोठे विमानतळ होणार असल्याचा सरकार अभिमान आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.