राज्यांना 10% अतिरिक्त एलपीजी कोटा प्राप्त होईल, फीडबॅक पाठवा
एलपीजीचा तुटवडा कायम असल्याची सरकारची कबुली : पंतप्रधान मोदींची पेट्रोलियम मंत्र्यांसमवेत दोन तास चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला एलपीजी सिलिंडरच्या सततच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. याचदरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना 10 टक्के वाढीव एलपीजी कोटा देण्याचे बुधवारी जाहीर केले. तसेच राज्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या असून पीएनजीवरून एलपीजीकडे टप्प्याटप्प्याने वाटचाल करण्यास सांगितले आहे. दरम्यान, वाढत्या एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत कच्चे तेल आणि गॅसची उपलब्धता, त्यांची आयात आणि संभाव्य संकटाचा सामना करण्याच्या धोरणांवर चर्चा झाली.
देशांतर्गत एलपीजी उत्पादनात 40 टक्के वाढ झाली आहे, परंतु परिस्थितीत पूर्णपणे सुधारणा झालेली नाही. एलपीजीचा तुटवडा कायम आहे. ऑनलाइन बुकिंगमध्ये सुधारणा झाली आहे, परंतु वितरकांकडे लांबच लांब रांगा कायम आहेत, असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकारी सुजाता शर्मा यांनी बुधवारी सांगितले. 15 राज्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरू असून, गेल्या चार दिवसांत अंदाजे 7,200 टन गॅस वितरित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. देशात तेल आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचा सरकारचा दावा आहे. विमान इंधनाची (एटीएफ) कमतरता नाही. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अद्याप वाढ झालेली नसल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधानांनी घेतला सविस्तर आढावा
गॅस आणि इंधन टंचाईच्या समस्येदरम्यान बुधवारी पंतप्रधानांची पेट्रोलियम मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत, सरकारने आपल्या आपत्कालीन राखीव साठ्याचा (एसपीआर) आढावा घेतला. गरज पडल्यास त्याचा वापर केला जाऊ शकतो. देशाकडे काही आठवड्यांचा तेलसाठा असल्यामुळे सध्या संकट येण्याची शक्यता कमी आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तथापि, युद्धाच्या काळातही, शिवालिक, नंदा देवी आणि जग लाडकी ही तीन भारतीय जहाजे तेल-एलपीजी घेऊन मुंबई आणि गुजरातच्या बंदरांवर दाखल झाल्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे.
पीएनजी वापरण्याचे सरकारचे आवाहन
सरकारने लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करून एजन्सींना भेट देणे टाळून केवळ अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरूनच बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार कठोर उपाययोजना करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मंगळवारी देशभरातील 2,300 हून अधिक एलपीजी आउटलेट्सवर अचानक तपासणी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तसेच सरकारने लोकांना जिथे उपलब्ध असेल तिथे पीएनजी वापरण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.