आयपीएलआधी दारू सोडली, भारतीय खेळाडूचा एबी डिविलियर्ससमोर मोठा खुलासा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. २८ मार्चपासून हा १९ हंगाम सुरू होणार आहे. जवळपास दोन महिने चालणाऱ्या या लीगमध्ये खेळांडूना उत्तम कामगिरी करण्याचे आव्हान असते. त्यामुळे फॉर्मबरोबर फिटनेसही महत्वाची ठरते. त्यासाठी एका भारतीय खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. त्या खेळाडूने दारू पिणे सोडले आहे, कारण त्याला संघाला विजेतेपद मिळवून द्यायचे आहे.
फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपल्या वैयक्तिक आयुष्यबद्दल मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे सर्व क्रिकेटविश्व हादरून गेले आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या चहलने दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिविलियर्सच्या युट्यूब चॅनलवर खुलासा केला की, तो गेल्या सहा महिन्यांपासून दारूपासून दूर आहे. डिविलियर्सनेही त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
चहलचे सर्व लक्ष आता फिटनेसवर आहे. त्याने म्हटले, “गेल्या सहा महिन्यांपासून मी दारूपासून दूर आहे. मी आता ३५ वर्षांचा झालो आहे, त्यामुळे मला अधिक फिट राहायचे असून मला माझ्या संघासाठी उत्तम योगदान द्यायचे आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आयपीएलमधील युवा खेळाडूंनी माझ्याकडून काहीतरी शिकावे अशी माझी इच्छा आहे.”
चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज असून त्याने मागील हंगामात अंतिम सामन्यातील पराभवावरही त्याचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळाडू मार्को जॅन्सेनची कमी जाणवली. तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला परतला होता. जर तो अंतिम सामन्यात असता तर आम्ही नक्कीच विजेतेपद पटकावले असते. त्याने संपूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी केली आणि फलंदातही काही षटकार मारण्याची त्याच्यात क्षमता असल्याने संघाच्या फायद्याचे आहे.”
मागील हंगामात चहलला दुखापत झाल्याने त्याला अंतिम सामन्यात त्याचा नैसर्गिक खेळ करता आला नाही. त्या सामन्यात त्याने ४ षटकात ३७ धावा देत एक विकेट घेतली होती. यामुळे त्याने आता त्याचे लक्ष फिटनेसवर केंद्रित केले आहे.
Comments are closed.