एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले

अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा : एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक, अतनु चक्रवर्ती यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आज (19 मार्च) एचडीएफसीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले. अतनु चक्रवर्ती यांनी बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने केकी मिस्त्री यांची 19 मार्चपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेअर बाजारातही मोठा भूकंप झाला असून तब्बल 2497 अंकानी घसरला. एचडीएफसीमधील घडामोडींचा शेअरवर परिणाम दिसून आले. एचडीएफसीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले. ते 43 रुपयांनी घसरून 800 रुपयांवर व्यवहार करत होते. एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये यावर्षी अंदाजे 20 टक्के घसरण झाली आहे.

बँकेची कार्यपद्धती माझ्या नैतिक मूल्यांशी विसंगत

आपल्या राजीनामा पत्रात, अतनु चक्रवर्ती यांनी बँकेच्या अंतर्गत संस्कृती आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत, मी बँकेतील काही घटना आणि कार्यपद्धती पाहिल्या आहेत, ज्या माझ्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिक मूल्यांशी विसंगत आहेत.

केकी मिस्त्री तीन महिन्यांच्या कालावधीसाठी

केकी मिस्त्री सध्या बँकेच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. बँकेत विलीन होण्यापूर्वी ते एचडीएफसी लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होते. बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या व्यापक अनुभवामुळे, त्यांची तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सूत्रे हाती घेण्यात आली आहेत. केकी मिस्त्री यांनी आश्वासन दिले की बँक पूर्णपणे स्थिर आहे आणि बँकेत कोणतीही मोठी चिंता नाही. मिस्त्री यांनी सांगितले की, देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे.

एचडीएफसी बँकेत कोणतीही गंभीर चिंता नाही

या प्रकरणी, रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बँकेने अर्धवेळ अध्यक्षांच्या पदासंदर्भात केलेल्या तात्पुरत्या व्यवस्थेला मंजुरी दिली आहे. एचडीएफसी बँक ही देशातील एक प्रणालीगतदृष्ट्या महत्त्वाची बँक असून तिची आर्थिक स्थिती मजबूत आहे. संचालक मंडळ व्यावसायिकपणे काम करत आहे आणि व्यवस्थापन संघ अत्यंत सक्षम आहे. सध्या बँकेच्या कामकाजाबाबत किंवा प्रशासनाबाबत कोणतीही गंभीर चिंता नाही. बँकेकडे पुरेसे भांडवल आहे आणि तिची तरलतेची स्थिती समाधानकारक आहे. पुढील वाटचालीबाबत रिझर्व्ह बँक बँकेच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाच्या संपर्कात राहील.

विलिनीकरणानंतर एचडीएफसी देशातील दुसरी सर्वात मोठी बँक

चक्रवर्ती यांनी त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख कामगिरीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात एचडीएफसी लिमिटेडचे ​​बँकेत विलीनीकरण झाले, ज्यामुळे ती देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनली. त्यांनी पुढे सांगितले की, या विलिनीकरणाचे पूर्ण फायदे अजून मिळणे बाकी आहे.

अतनु चक्रवर्ती हे 1985 च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस

अतनु चक्रवर्ती हे गुजरात केडरच्या 1985 च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या 35 वर्षांच्या सेवेदरम्यान, त्यांनी आर्थिक व्यवहार सचिव यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली. त्यांनी अर्थसंकल्प निर्मिती प्रक्रिया आणि गुंतवणूक विभागाचेही नेतृत्व केले. एप्रिल 2021 मध्ये चक्रवर्ती यांची एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मे 2024 मध्ये त्यांची या पदावर पुनर्नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ मे 2027 पर्यंत होता.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.