IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर, संघात खळबळ

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीच, राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार इंग्लिश अष्टपैलू खेळाडू, सॅम करन, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करन मांडीच्या दुखापतीशी (groin injury) झुंज देत आहे. परिणामी, आयपीएल 2026 मधील त्याचा सहभाग आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 27 वर्षीय करनने 5 मार्च रोजी आयसीसी टी20 विश्वचषक 2026 दरम्यान इंग्लंडसाठी आपला शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला होता. तेव्हापासूनच त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते आणि आता ही दुखापत राजस्थान संघासाठी चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये चेन्नई सुपर किंग्जसोबत केलेल्या एका ट्रेडद्वारे राजस्थान संघाने करनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. या मोठ्या अदलाबदलीमध्ये रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थानच्या संघात दाखल झाले, तर संजू सॅमसन चेन्नईच्या गोटात गेला.
सॅम करनने यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी खेळले आहे. सॅमने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात 2019 मध्ये पंजाब संघासोबत केली होती. त्यानंतर, 2020 ते 2021 या कालावधीत तो चेन्नई संघाचा भाग होता. मात्र, 2023 मध्ये पंजाब संघाने करनला 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते, यासह या युवा अष्टपैलू खेळाडूचे पंजाब फ्रँचायझीमध्ये पुनरागमन झाले होते. 2025 मध्ये, करन पुन्हा एकदा चेन्नई संघात परतला. तथापि, मागील हंगामातील त्याची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नव्हती. पाच सामन्यांमध्ये त्याला केवळ 114 धावा करता आल्या होत्या आणि केवळ एकच बळी मिळवता आला होता.
सध्या तरी, करनच्या जागी पर्यायी खेळाडू निवडण्याबाबत राजस्थान संघाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, तरीही संघ सध्या विविध पर्यायांचा सक्रियपणे शोध घेत आहे. संघात आधीच रवींद्र जडेजासारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहे. शिवाय, डोनोव्हन फरेरा हा देखील एक आक्रमक फलंदाज आणि उपयुक्त ऑफ-स्पिनर म्हणून संघाला समतोल प्रदान करू शकतो.
Comments are closed.