टी20 वर्ल्ड कप 2026 मधील खराब कामगिरीनंतर ‘या’ संघाच्या कर्णधाराचा राजीनामा; संपूर्ण स्पर्धेत मिळाला होता केवळ 1 विजय!

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील खराब कामगिरीनंतर पॉल स्टर्लिंगने मोठा निर्णय घेत आयर्लंडच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. भारत आणि श्रीलंका येथे खेळल्या गेलेल्या या मोठ्या स्पर्धेत आयर्लंडच्या संघाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आणि संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला. ३५ वर्षीय स्टर्लिंगला स्वतःलाही या वर्ल्ड कपमध्ये विशेष काही करता आले नाही आणि संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. याच कारणामुळे स्टर्लिंगने हे मोठे पाऊल उचलले आहे.

​क्रिकेट आयर्लंडने गुरुवारी (१९ मार्च) आपल्या ‘एक्स’ (X) अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून पॉल स्टर्लिंगच्या टी-२० कर्णधारपदाच्या राजीनाम्याची माहिती दिली. ३५ वर्षीय स्टर्लिंगने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा संघ २०२८ च्या पुढील टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, कर्णधारपद सोडले असले तरी स्टर्लिंग संघापासून दूर जाणार नाही. क्रिकेट आयर्लंडनुसार, स्टर्लिंग अजूनही वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम राहील आणि संघाचा महत्त्वाचा खेळाडू म्हणून खेळत राहील.

​कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर स्टर्लिंग म्हणाला की, “सखोल विचारविनिमय केल्यानंतर, मी आयर्लंडच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० मध्ये आयर्लंडचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट राहिली आहे.” त्याने आपल्या निवेदनात संघ सहकारी, कोचिंग स्टाफ, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांचे आभार मानले, ज्यांनी त्याला नेहमीच साथ दिली. त्याचे म्हणणे आहे की, जरी तो टी-२० चे कर्णधारपद सोडत असला, तरी संघाप्रती असलेली त्याची निष्ठा पूर्वीसारखीच राहील.

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आयर्लंडचा संघ ग्रुप-बी मध्ये चौथ्या स्थानावर राहिला आणि त्यांना केवळ ३ गुण मिळवता आले. आयर्लंडला स्पर्धेत फक्त एक विजय मिळाला, तर दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. तसेच, एक सामना अनिर्णित राहिला. या ग्रुपमध्ये आयर्लंडव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ओमान या संघांचा समावेश होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पॉल स्टर्लिंगच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचा या स्पर्धेतील प्रवास अर्ध्यातच संपला. त्याच्या जागी यष्टीरक्षक लॉर्कन टकर याने कर्णधारपद सांभाळले होते.

​२००९ मध्ये पदार्पण करणारा पॉल स्टर्लिंग आयर्लंडचा सर्वात यशस्वी टी-२० फलंदाज आहे. स्टर्लिंगने आतापर्यंत खेळलेल्या १६३ सामन्यांमध्ये १३४ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ३८९५ धावा केल्या आहेत. स्टर्लिंगने ४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, ज्यामध्ये २० विजय आणि २६ पराभव मिळाले, तर २ सामने अनिर्णित राहिले. आता टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर त्याचे लक्ष वनडे फॉरमॅटमध्ये संघाला नव्या उंचीवर नेण्यावर असेल.

Comments are closed.