इराणचा मोठा हल्ला! अमेरिकेचे अत्याधुनिक F-35 फायटर जेट टार्गेटवर; युद्धकाळात पहिल्यांदाच इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य-पूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून युद्धादरम्यान अमेरिकेच्या अत्याधुनिक एफ-३५ लढाऊ विमानाला एका अमेरिकी तळावर आपत्कालीन लँडिंग करण्यास भाग पडले. विमान आणि वैमानिक दोघेही सुरक्षित आहेत. या घटनेमुळे अमेरिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, इराणवरील लढाऊ मोहीम पूर्ण केल्यानंतर हे लढाऊ विमान मध्य पूर्वेतील एका अमेरिकी तळावर सुरक्षितपणे उतरले. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, हे F-35 विमान इराणच्या आकाशात एक महत्त्वाचे कॉम्बॅट मिशन पूर्ण करत असताना त्याला लक्ष्य करण्यात आले. विमानावर झालेल्या हल्ल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. सुदैवाने, या घटनेत वैमानिक सुरक्षित असून विमानाची सध्या तांत्रिक तपासणी आणि चौकशी सुरू आहे. १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमत असलेले हे विमान शत्रूच्या रडारला चकवा देण्यात माहीर मानले जाते. मात्र इराणने त्याला टार्गेट केल्याने अमेरिकेच्या हवाई सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) या घटनेचा एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने मध्य इराणच्या आकाशात अमेरिकन विमानाचा अचूक मागोवा घेऊन त्याला धडक दिल्याचे दिसत आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांच्या संरक्षण यंत्रणेने अमेरिकेच्या या अदृश्य समजल्या जाणाऱ्या विमानाचे गंभीर नुकसान केले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला असतानाच ही घटना घडल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

Comments are closed.