इराणचा कतारच्या गॅस प्रकल्पावर भयंकर हल्ला; सौदी, कुवेत, यूएईमधील इंधन प्रकल्पांतील उत्पादन ठप्प
साऊथ पार्स गॅस प्रकल्पावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे खवळलेल्या इराणने आज अमेरिका, इस्रायलसह जगाला हादरवून टाकले. जगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कतारमधील रास लाफान गॅस प्रकल्पावर इराणने भयंकर ड्रोन हल्ला चढवला. त्याचबरोबर यूएईमधील सामरेफ, कुवेतमधील मिना अब्दुल्ला, मिना अल् अहमदी या रिफायनरींनाही लक्ष्य केले. या हल्ल्यांनंतर संबंधित प्रकल्पांतील काम ठप्प झाले आहे. दरम्यान, इस्रायलच्या हैफा आणि अश्दोद रिफायनरींवर इराणने क्षेपणास्त्रे डागली.
मागील 20 दिवसांपासून सुरू असलेले इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध आता लष्करी कारवाईपुरते मर्यादित राहिलेले नाही. या संघर्षाचे तेल युद्धात रूपांतर झाले आहे. इराण ऐकतच नसल्याने हतबल झालेल्या इस्रायलने बुधवारी इराणच्या सर्वात मोठ्या साऊथ पार्स गॅस प्रकल्पावर हल्ला चढवला. त्यामुळे संतापलेल्या इराणने आखाती देशांतील तेल-गॅस प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. टार्गेटवर असलेल्या प्रकल्पांची यादीच इराणने जाहीर केली. त्यानंतर काही तासांतच ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यात रास लाफान प्रकल्पासह अन्य रिफायनरींचे मोठे नुकसान झाले. इराणच्या हल्ल्यांचा युरोपला फटका बसला असून युरोपीय देशांत तेलाचे दर भडकले आहेत.
हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा
इराण युद्धामुळे हिंदुस्थानातील गॅस पुरवठा आधीच विस्कळीत झाला आहे. होर्मुझमधील वाहतूकबंदी हे याचे कारण होते, मात्र आता इराणने कतारच्या रास लाफान गॅस प्रकल्पावरच हल्ला केला आहे. त्यात प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. युद्ध थांबले तरी प्रकल्प पुन्हा सुरू होण्यास वेळ लागणार आहे. हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय बाजारातून 50 टक्के एलएनजी आयात करतो. त्यातील तब्बल 20 टक्के एकटय़ा कतारमधून येते. त्यामुळे रास लाफानवरील हल्ला हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
इस्रायलच्या हैफा आणि अश्दोद रिफायनरीवर हल्ला
इराणने गुरुवारी इस्रायलला जबरदस्त दणका दिला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने इस्रायलच्या हैफा आणि अश्दोद येथील रिफायनरींवर क्षेपणास्त्रे डागली. त्यासाठी ‘नसरल्लाह’ क्षेपणास्त्रांचा वापर केला. या हल्ल्यानंतर रिफायनरीच्या ठिकाणी आगडोंब आणि धुराचे लोट उसळले.
गुरुवारी काय घडले?
- होर्मुझ ओलांडणाऱ्या जहाजांना टोल लावण्याचा इराणचा विचार.
- रशियानंतर चीननेही लारीजानी यांच्या हत्येचा निषेध केला आहे.
- इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या नावाखाली इराणमध्ये 97 जणांना अटक करण्यात आली.
- आखाती देशांनी संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली असून तत्काळ चर्चा करण्याची मागणी केली आहे.
कच्च्या तेलाचा भाव 146 डॉलर्स, पेट्रोल-डिझेल महागणार
कच्च्या तेलाचा भाव बॅरलमागे 146 डॉलरवर गेला आहे. युद्ध सुरू होण्याआधी बॅरलचा भाव 72 डॉलर इतका होता. त्यात गेल्या 20 दिवसांत थेट दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलही महागण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टनमधील लष्करी तळावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या
इराण युद्ध आता अमेरिकेच्या घरात पोहोचले आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील एका महत्त्वाच्या लष्करी तळावर संशयास्पद ड्रोन घिरटय़ा घालत असल्याचे आढळले आहे. अमेरिकेचे गृहमंत्री मार्को रुबियो आणि सुरक्षा मंत्री पीट हेगसेट हे याच तळावर राहतात. त्यामुळे अमेरिकेत चिंता वाढली आहे. हे ड्रोन नेमके कुठून आले हे कळू शकलेले नाही.
ईदचे नमाज उघडय़ावर करण्यास सौदीची मनाई, हवाई हल्ल्याच्या भीतीने मशिदीतच प्रार्थना करण्याच्या सूचना
इराणकडून सातत्याने होत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सौदी अरेबियात ईदची नमाज उघडय़ावर पठण करण्यास मनाई करण्यात आली आहे. ईदची नमाज मशिदीत किंवा सरकारने ठरवून दिलेल्या सुरक्षित जागेवरच अदा करावी, असे आदेश सौदीच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने ‘एक्स’च्या माध्यमातून दिले आहेत.
Comments are closed.